पू. बाबामहाराजांनी आखून दिलेली दिनचर्या
प्रत्येकानें सकाळीं साडेचार ते पांचचे दरम्यान उठावें. पुढें प्रातः स्मरण, प्रातर्विधी व स्नान सहा वाजेपर्यंत आटोपावें. सहा वाजतां सूर्याभिमुख होऊन सूर्यनमस्कार घालावेत. आपलें आन्हिक, आपआपले परंपरेप्रमाणे आटोपून आपल्या प्रियदेवतेची मानसपूजा करावी. आठ वाजेपर्यंत हें सर्व आटोपावें.
पुढें, आपल्या व्यवहारी जीवनक्रमास सुरुवात करावी. व्यवहारांत वागत असतांना आचार संहिता डोळ्यांसमोर असावी. सायंकाळीं साडेसहा वाजतां व्यवहाराचे सर्व कामातून वृत्तीनें कटाक्षानें वेगळें व्हावें. जर कांहीं त्या दिवसाचा व्यवहार पूर्ण व्हावयाचा असेल तर तो दुसरे दिवशीं सकाळीं आठचे नंतर करावा.
याप्रमाणें सायंकाळीं साडेसहाला मुख-प्रक्षालन व हातपाय धुऊन एकांत घेण्याकडे वृत्ति वळवावी. साडेसातपर्यंत एक तास, शक्यतोंवर निसर्गात वृत्ति निवांत करून बसण्याचा अभ्यास करावा. याचवेळीं प्रार्थना चिंतन वा स्मरण करण्यास हरकत नाही; पण एकटेपणाची मात्र निश्चिति असावी. साडेसातचे पुढें गृहकर्मे-मुलाबाळांची वास्तपुस्त करणें, सप्रेमे सर्वांचे समाधान करणें.
रात्री आठ ते नऊ अल्प भोजन अथवा फलाहार करावा. नऊचे पुढें जुळल्यास, सद्ग्रंथवाचन, सत्श्रवण करावें. दहापर्यंत हा कार्यक्रम आटोपावा.
दहाचे पुढें थोडा वेळ, शवासन करून स्वस्थचित्त व्हावें तेच वेळीं निद्रा आली, तर नामस्मरण करीत झोपावें किंवा पंधरावीस मिनिटानंतर आपले उपासनेचे जागीं माळ घेऊन ध्यानाच्या भूमिकेवर आरूढ व्हावे.
असा हा दैनंदिन उपक्रम निश्चयानें साधावा. तसेंच फुरसतीच्या सर्व वेळीं जास्तीत जास्त एकांतसेवन व त्यांतील काहीं वेळात कौटुंबिक स्वास्थ्यासंबंधी विचार करणे, क्रियाशील होणें, तसेंच सत्संग घेणें आदि शांति व समाधान देणारी कर्मे करावीं.

पू. बाबामहाराज माचणूर येथे श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा करताना
पूजेच्या वेळी करावयाच्या गोष्टी:
(१) आपले स्वतंत्र असे देवघर असावें, तेथेंच हा कार्यक्रम करावा.
(२) मूर्तीचे सौन्दर्यांपेक्षां बाह्य शृंगार अधिक नको. चित्त मूर्तीच्या सौंदर्यावर लुब्ध होईल असा सर्व साज असावा.
(३) एक निरांजन आणि दुसरे उदबत्ती घर या साहित्याशिवाय अधिक साहित्य देवापाशी नसावे.
(४) पूजेच्या उपचारानंतर ज्ञानेशांची आरती म्हणावी.
(५) तीर्थ प्रसाद घ्या आणि पसायदान म्हणा.
पसायदानानंतर तीर्थ-प्रसाद सेवन करावा व विनम्रतेने नमस्कार करून पूजा आटोपावी.
