पू. बाबामहाराजांचे गुळवणी महाराजांशी दिव्य नाते

पू. बाबांच्या निर्वाणकाळाआधी त्यांचे समकालीन संत पू. गुळवणी महाराज व त्यांची सोलापूरला भेट झाली. परंतु पूर्ण वेळ दोघांमधे नजरेनेच संवाद झाला.
नंतर काही शिष्यांनी गुळवणी महाराज यांना विचारले की आमचे बाबा यातून बरे होतील का? पू. गुळवणी महाराज म्हणाले की दत्तगुरूंनी पू. बाबांवर फार मोठी कामगिरी सोपविली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे, कोणी कितीहि थांबण्यासाठी अट्टाहास केला तरी ते थांबणार नाहीत.
पू. गुळवणी महाराजांनी पू. बाबांच्या निर्वाणानंतर पाठवलेल्या संदेशात ते म्हणाले,
“' चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।'
ह्या श्रीज्ञानेशानीं कथिलेल्या संतत्वाचा श्रीबाबांचे ठिकाणीं नित्य जागर होता. महाराष्ट्र भूमंडळांत एका नव्या धर्मजागरणाची प्रार्थना प्रभात त्यांचे करवी प्राची- कडे आरक्त वर्णांकित सुचिन्हांनीं मंडित झाली आहे. त्यांच्या दिव्यामृतधारा ह्या ग्रंथांतील अमृतधारांच्या वर्षावामुळे, शतकानुशतकें श्रद्धाशील साधक वर्ग न्हाऊन आपापले अंगदोषांची सहज निष्कृति व श्रीगुरुचरणाची मधुरारती साधणार आहेत.
श्रद्धेय श्रीबाबांच्या दिव्य स्मृतीस माझें अभिवादन !"
