पू. बाबामहाराजांचे श्री तुकडोजी महाराजांशी दिव्य नाते

पू. बाबामहाराजांच्या शालेय शिक्षणाच्या काळांत आर्वीत श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमहंस दशेत वावरत असत.
पू. बाबांच्या वडिलांचा श्रीमन्महा तुकडोजींशी स्नेह जडला. स्नेह समृद्ध झाला. महाराज कधीकधी त्यांच्या गृही राहात व जात-येत. पू. बाबांना त्या पवित्र पुरुषाने आकृष्ट केले. पू. बाबांनी एकदा त्यांचे खंजरी भजन ऐकले. तेव्हा पू. बाबांचे वय दहा वर्षाचे असेल. ते मुग्ध झाले. त्यांचे डोळे गळू लागले. शरीर व नेत्र तटस्थ झाले. जमलेला समुदाव भजन संपल्यावर घरोघर निघून गेला हे पू. बाबांच्या ध्यानी-मनीही नाही. बऱ्याच कालानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना हांक दिली तेव्हा भजन संपून एक तास अवधी लोटला होता. त्यांनी विचारले,
"भाऊ, (वडिलांना घरी भाऊ म्हणत) भजन केव्हा संपले हो?"
"अरे चल ! बराच वेळ झाला."
मग "महाराज (तुकडोजी) कोठे हो गेले."
"अरे ते गेले मुक्कामाच्या जागी"
"भाऊ, आपण पण जाऊ या का हो त्यांच्याकडे!"
असा प्रश्न येताच वडिलांना आनंद झाला. पण उगाच ते म्हणाले,
"अरे आता रात्रीचे अकरा वाजलेत. आता का कोणाकडे जायचे असते!"
पू. बाबा स्वस्थ झाले पण त्यांना वाटे कधी आपण महाराजांना भेटू, बोलू, त्यांची सेवा करू, ही त्यांची अंतरओढ पित्याने जाणली. ते म्हणाले गेलो तर त्या घरच्या लोकांना त्रास होईल, नाहीतर गेलो असतो आपण! तेव्हा पू. बाबा म्हणाले,
"अहो भाऊ त्यांना नाही त्रास होणार. मी लहान आहे. त्यांना मी नमस्कार करून सांगेन व पाच मिनिटांत आपण दर्शन घेऊन माघारी वळू आणि मला वाटते ती मंडळी जागीच असतील. संताच्या सहवासात झोप तरी कशी येणार हो!"
वडील हर्षले. पू. बाबांना घेऊन ते महाराजांकडे रात्री अकराला निघाले. हाच तो प्रथम प्रत्यक्ष भेटीचा योग. महाराजांच्या सान्निध्यांत भावभक्तीने बहरलेल्या लहानग्या पू. बाबांचा हळुवार मनाचा पहिला दर्शन योग.
पू. बाबांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी पू्र्वायुष्यातही काही वेळा भेट झाली. राष्ट्रसंतांचे एक शिष्य श्री. मोहोड म्हणाले,
"मी राष्ट्रसंतांसमवेत पंढरपूरला गेलो होतो. तेथे बाबा महाराज राष्ट्रसंतांना भेटायला आले होते. त्या भेटीच्या वेळी मी तिथे हजर होतो. संतद्वयांची ती भेट होती, ५-७ मिनिटांचीच ! पण तीत एवढा जिव्हाळा, आपुलकी आणि परस्परांचा सन्मान होता की, त्या दर्शनाने मी अगदी भारावून गेलो आणि बाबांची एक वेगळीच छाप माझ्यावर पडली."
नंतर काही वर्षांनी, राष्ट्रसंतांनी देह ठेवल्यावर पू. बाबांनी श्री. मोहोड यांना माचणूरला उत्सवाला आमंत्रित केले व त्यांच्यावर खूप वात्सल्य व जिव्हाळा व्यक्त केला आणि त्यांना म्हणाले, "तुमच्या रूपाने राष्ट्रसंतच येथे आहेत ही माझी धारणा !"
यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की संत हे दुसऱ्या संतांना प्रतिबिंब रूप असतात व ते त्या संतांच्या शिष्यांमध्येही त्या महात्म्यांचेच दर्शन करतात.
