पू. बाबामहाराजांचे श्रीसमर्थ रामदासस्वामींशी दिव्य नाते

काही विलक्षण आठवणी पू. बाबा व श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या आत्मीय बंधनाचे पुरावे देतात.
साधारण १९५५ साली पू. बाबामहाराज दासनवमीला सज्जनगड़ावर गेले होते. तेथे त्यांचे एक पार्शद पू. अनंतस्वामी यांची प्रथम भेट पू. बाबांद्वारे आधीच नियोजित होती. त्याच वेळी आणखी दोन शिष्य भेटी तेथे झाल्या. एका शिष्याने सांगितलेली तेथिल एक घटना अशी:
“सज्जनगडावर समाधी मंदिराचे परिसरात चौकोनी फरशीवजा दगड सर्वत्र बसवलेले. पू. बाबांच्या पायात खडावा होत्या. ते चालत असताना टक् टक् असा संन्यासधर्माची स्मृति जागवणारा आवाज वातावरणात भरून राही. पू.बाबा श्रीसमर्थांचे समाधी मंदिराकडे निघाले. मीही त्यांचे मागोमाग चालू लागलो.
तळघरात श्रीसमर्थांची समाधी व समाधीच्या छतावरील सुबक गाभाऱ्यात श्रीरामपंचायतनाच्या मूर्ती अशी रचना आहे. समाधी दर्शनासाठी तळघरात जावे लागते. बहुधा अंधार दाटून असतो. उजळलेल्या समईच्या व टांगलेल्या पंचज्योती पात्राचा काय प्रकाश समाधीवर पडेल तेवढाच.पू. बाबा अत्यंत गंभीर, विनम्र मुद्रेने तळघरात गेले. मी मागोमाग. ते एकटेच समाधी मंदिरात वाकून गेले. मी बाहेर लक्षपूर्वक उभा होतो. पू. बाबांनी समाधीवर कपाळ टेकवले. डोक्यावरील काळेभोर केस समाधीवर पसरलेले. जणू चेहऱ्याभोवती केसांनी पांघरलेला मखमली बुरखाच! २ मिनिटे झाली, ५ मिनिटे झाली. पू. बाबांचे डोके वर उचलले जाईना. समाधी मंडपातले सारे लोक गंभीरपणे तटस्थ होते. दर्शन घेण्याची ही संताघरची न्यारी रीत आजच सर्वांना पहावयास मिळत होती. हालचाल अजिबात बंद. कसले हे दर्शन ! देहाची गती पांगुळलेली! वाचा मौनावलेली! केवळ निःशब्द भेट!!!
१५/२० मिनिटांनी पू. बाबांनी डोके उचलले. डोळे धन्यतेने सुखावलेले, चेहरा संतदर्शनाच्या आनंदाने तेजाळलेला. इतरेजनांना संतदर्शन कसे घ्यावे याचा प्रत्यक्ष वस्तुपाठ मिळालेला.
मला पाहिल्यावर पू. बाबा म्हणाले,
"किती पावन आहे नाही ही भूमी! येथील कणनकण श्रीसमर्थांच्या ब्रह्मतेजाने कसा न्हाऊन निघाला आहे! चला स्नानाला जाऊ."
असे म्हणतच ते उठले. सोबत मी, आणखी एक सज्जनगडावर उपासनेसाठी राहिलेले त्यागी, सत्वशील साधक होतो. पू. बाबा तळ्याकडे निघाले. अंगावरचे कपडे काढले व अक्षरशः त्या भूमीत ते लोळू लागले. ते म्हणाले,
"या पवित्र धुळीने आपला देह माखला पाहिजे नाही! त्या अतुल सामर्थ्यशाली महापुरुषाने आपली सारी तपस्या. 'बहुजन हिताय. बहुजनसुखाय' खर्ची घातली म्हणून आज या महाराष्ट्र देशात आपण महाराष्ट्रीय म्हणून मोठ्या दिमाखाने मिरवत आहोत. त्यांचे ऋण कधीही न फिटणारे आहे."
धूळस्नान झाल्यावर त्यांनी तळ्यात उडी मारली. पोहण्याचा चांगलाच सराव दिसला. पाण्यात डुबकी देऊन तळातील गाळ बराच घाटाच्या पायरीवर साठवून तो सर्व गाळ नखशिखांत चोपडून घेतला. श्रीसमर्थांबद्दल अंतरंगी नांदणारा निर्व्याज, अकृत्रिम आदर अशा प्रकारे ते व्यक्त करीत होते व संताचे भूमीत व स्थानात साधकाने कसे विहरावे याचा धडाही आमच्यासारख्यांना देत होते.
“जयजय रघुवीर समर्थ" अशी गर्जना घुमवून पू. बाबा तलावाबाहेर आले. "
जरी परमेश्वर विविध रूपांत प्रकट होत असला, तरी त्याचे तत्व मात्र अपरिवर्तित राहते. त्यामुळे, संत बाबा महाराजांनी श्रीसमर्थ रामदास स्वामींसोबत दिव्य संवाद साधला यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही—तथापि, आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी, अशा अनुभवांची अद्भुतता मनाला भारावून टाकते:
पू. बाबांच्या शेवटच्या काही वर्षांमधील ही घटना. पू. बाबा व काही निवडक साधक पू. बाबांच्या दिव्यामृतधारा या ग्रंथाचे लिखाण कार्य करीत होते. यामध्ये त्यांचे अंतरंग शिष्य पू. माधवस्वामीही होते.
दरम्यान एक दिवस पहाटेच पू. माधवस्वामींना पू. बाबांची, "माधवा माधवा..." अशी हाक ऐकू आली. पू. माधवस्वामी लगेच सामोरे गेले व नमस्कार केला. तसे पू. बाबा म्हणाले, "आत्ताच समर्थ रामदास आले होते. नगर जिल्ह्यातील त्यांनी स्थापन केलेली गोमयीन हनुमान मूर्ती व त्या मंदिराकडे लक्ष देण्याची व नवीन बांधकामाची जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. मला जमणार - नाही पण माझा माधवा हे काम करेल असा मी त्यांना शब्द दिला आहे."
आता सर्व कामे बाजूला टाकून या कामाला लाग अशी पू. बाबांची गुरुआज्ञा पू. माधवस्वामींना झाली. नंतर पू. माधवस्वामींना प्रथम नगर ज़िल्ह्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी या स्थानाचा शोध पू. बाबांच्या आज्ञेनुसार लागला तेव्हा त्यांना त्या गावाच्या वेशीवरच श्रीसमर्थ रामदास आणि हनुमंतांचे दर्शन झाले. पुढ़े तेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले.
