top of page

शुद्धतम विचाराचा वारसा

Updated: 1 day ago

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

शास्त्रानी आणि संतांनी जीवनाच्या प्रत्येक क्षणी शुद्धतम विचाराचा वारसा निर्माण केला आहे. संतांनी तर मानवी जीवन उंचविण्याचा कळस केला आहे. तुका झालासे कळस ।। जीवन विषयक कल्पना स्थायी भावाने स्थिर होण्यासाठी याची जरूरी आहे. इच्छा ही नित्कृष्ट अवस्थांचे दर्शन करणारी अपूर्ण स्थिती आहे. जीवनाचा क्षण न क्षण ईश्वराला समर्पित केला पाहिजे. एका क्षणात जरी देवदर्शन झाले, तर पुढचा क्षण देवाच्या दारात उभा करील. इच्छा देवाची आणि विकार देवाकरता अशी अवस्था प्रेमस्वरूपाप्रत नेते. विकार ही परमात्म्याची प्रेरणा आहे. परंतु तो अहंकाराच्या विकृतीने नटला म्हणून त्याज्य आहे. निसर्गशक्ती ही उपयोगावर अवलंबून आहे. परमेश्वराने दिलेले ते देणे आहे. परमात्मप्रेमाने हृदय भरले की विकार नाहीसे होतात. देव माझा मी देवाचा. या समजण्यातच ज्ञानाची प्रचिती आहे. जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।' या जाणिवेने आहे ते ईश्वरस्वरूप समजावयाचे नाही. ते ईश्वरस्वरूप आहेच. हे संतांचे समजणे ज्ञाननिष्ठ अवस्थेतले आहे. देव पाणी मी तरंग, देव प्रकाश मी किरण अशी दासाची स्थिती झाली की जनाबाईच्या पुढ्यात देवाला राबवावे लागले. तिने हरि रात्रंदिवस बरोबर नांदविला. आत्मचिंतनाने भगवंताचे सुख असे आकाराला येते. आमचे भजन हे परमात्म्याचे भजन झाले पाहिजे. म्हणजे देव सन्निध येतो. डोक्यात देव नाही, देवाच्या पायावर डोके काय उपयोगाचे? पदार्थ प्राप्त व्हावा म्हणून बुद्धिला भ्रमविण्याचा हा प्रकार आहे. यामुळे ईश्वरधर्म संवेदित होत नाही. भक्ती चित्तात येत नाही तोपर्यंत प्रयोग हे पाखंड आणि दंभाचार. कर्मात दक्ष, चित्ताने मोकळा तो ज्ञानातही संतुष्ट असतो. परमात्मा म्हणजे माझ्या प्रेमाने खेळणे, मला समजून घेणे. समजून घेतले की ईश्वराचे प्रेम, उपकार कर्त्याचा उपकार जागा आहे. देवाचेच देवाला देण्यात दातृत्व नाही. तुझे तू घेऊन मला मोकळे कर अशी ही स्थिती आहे. देव सर्वाकार सर्व स्वरूपाने स्थित आहे. परमात्म प्रेमाने भरलेल्या कुंभाराने चिखलात स्वपुत्र तुडवला. असे स्वभावतः प्रभुप्रेम निर्माण झाले पाहिजे. परमात्मा प्रेम हे अमर करणारे दिव्य आहे. नामस्मरणात जीव खेळविणे, इंद्रिये रत करणे म्हणजे भक्तीचा धर्म जागेल. परमात्म्याचे परमात्मपण माझ्या प्रेमात दंग होऊ दे. रत होऊ दे. जी जी वस्तु दिसेल ती ती परमात्मस्वरूप दिसू दे, हरिरूप दिसू दे. असे ज्ञानच जीवनाचे सार्थक करील.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page