दैवी सामर्थ्य
- shashwatsangati
- Sep 10
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
दैवी सामर्थ्य याचा अर्थ सत्त्वशुद्ध झालेल्या माणसामध्ये जे तेज झळकतं, जे तेज निर्माण होतं, जे निर्भयत्व येतं ते त्याचं दैवी सामर्थ्य आहे. केवळ विश्वात चमत्कृतिजन्य प्रकार निर्माण करणाऱ्या माणसाला दैवी संपदावान म्हणता येत नाही. आज समाजामध्ये हा एक संभ्रम आहे. अनेकजण चमत्कृती निर्माण करणाऱ्या माणसाला परमेश्वराचा साक्षात्कार झाला असा समज समाजामध्ये रुजविण्याचा, रुढ करण्याचाही प्रयत्न आहे, पण तो खोटा आहे. आपण सावध असलं पाहिजे. अर्थात दैवी संपदावान पुरुषामध्ये सामर्थ्य नसतं असं नव्हे, पण तो माणसाचं ज्ञान झाकेल, माणसाचा अहंकार बलवान होईल किंबहुना माणसाची जी काही अशुद्धता आहे ती वाढीला लागेल असं कार्य करणारं ते सामर्थ्य नव्हे. खरं दैवी सामर्थ्य ते आहे की माणसाच्या स्वरूपस्मृतीकडे मन फेकलं जातं. "नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वतप्रसादान्मयाच्युत" इथे श्रीकृष्णाच्या सामर्थ्याची ग्वाही अर्जुन देतो की, माझा मोह गेलेला आहे आणि मला स्मृती, स्वरूपस्मृती जागी झालेली आहे. हे कृष्णाचं खरं सामर्थ्य आहे. विराट दर्शन करून दिलं तिथेही अर्जुन संतुष्ट होत नाही, शांत होत नाही. आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की, विराट दर्शन श्रीकृष्णाने त्याला करून दिलेलं आहे अकराव्या अध्यायात. पण अर्जुन संतुष्ट नाही. तो अशांत होता. त्याचे प्रश्न अजून शिल्लक होते. पण प्रश्न तेव्हा मिटले, त्या वेळेला मिटले की ज्या वेळेला श्रीकृष्णाच्या शुद्धतम स्वरूपाचा भक्तिमय विवेक त्याच्यासमोर ठेवण्यात आला आणि शुद्ध ज्ञान तेरा, पंधरा या अध्यायाद्वारे त्याला कळलं. त्या वेळेला तो म्हणतो की तुझ्या प्रसादाने, तुझ्या प्रसन्नतेने, तुझ्या कृपेने माझा मोह गेलेला आहे. हा मोह नाहीसा होणं, जगातला भोगात्मक संकल्प नाहीसा करणं हे कार्य दैवी सामर्थ्याचं आहे.
|जोपर्यंत चमत्कारावर आमची श्रद्धा आहे तोपर्यंत आपण लक्षात ठेवा की ती आसुरी संपत्तीच आहे की ज्या संपत्तीचा आजच आपण आश्रय करतो आहोत. ही आसुरी संपत्तीच आहे. मानवकृत संपत्ती आहे. अर्थात दैववान, देवाधीन असलेल्या लोकांमध्ये जरी सामर्थ्य असतं तरी पण त्या सामर्थ्याचा वापर माणसाच्या प्रगतीसाठी आहे, माणसाच्या शुद्धतेसाठी आहे. माणसं अशुद्ध करण्यासाठी नव्हे. सामर्थ्य दानवांतही होतं. एवढंच नव्हे तर देवांपेक्षा बलवान सामर्थ्य होतं. आपण जर विचार केला तर इंद्र, चंद्र, सूर्य या सर्वांना आपल्या खाटेखाली झोपवणारा रावण जरा आठवावा. पण रावणाला पवित्र म्हंटलेल नाही. दैवी संपदा याचा अर्थ आहे आकाशातल्या कुठल्याही शक्तीने मी वाकणार नाही, फक्त वाकेन ते ईश्वरासमोर. हे व्रत ज्याच्यामध्ये अविर्भूत झालं आहे तो दैवी संपदावान पुरुष आहे.




Comments