संतधर्म
- shashwatsangati
- Aug 20
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

आज आपण व समाज विच्छिन्न दशेत जगत आहोत. दैन्य, दारिद्रय व भ्रष्टाचार यांचा सर्वत्र धिंगाणा चालू आहे. माणसास सज्जनतेने राहणे व जगणे या जगात कठीण होत आहे. मग धर्मजीवन तर दूरच राहीले. संतांनी जगास वारंवार अशाच विमनस्क व अत्यंत आसुरी प्रवृत्तितून मार्गदर्शन केले आहे. त्यांचेच उपकार की आज आम्ही काही अंशाने का होईना सज्जनता समजू शकतो. संतांशिवाय या जगास कोणीही काहीही दिलेले नाही. सारा इतिहास न्याहाळा. राजे महाराजे झाले, गेले. पण समाजाला माणूस म्हणून राखले संतांनी. त्यांच्या उपदेशाचा ठसा आजही मानवी मनावर स्पष्ट आहे. त्यांनीच खऱ्याखुऱ्या सुखाची जीवन वाट आखली. माणसास जीवनावर कसे प्रेम करावयाचे ते शिकविले व त्यामुळेच आज आपण काहीतरी जगासाठी, कल्याणासाठी जगावे अशी सत्प्रवृत्ती वापरत आहोत. नाहीतर दुर्दम्य दुराभिमान, हक्काच्या आसुरी जाणीवा, सुखाच्या अतिक्रमणशील कल्पना, यांनी आपल्या जीवनाचा सत्यानाश करून मानवी जीवन उध्वस्त केले असते. आज जगात असेच वारे वहात आहेत. केवढी भीषणता, केवढे क्रूरत्व, केवढी दीनता व भ्रष्टता. सारे पाहिले म्हणजे वाटते या जगाचे कसे व्हायचे! कोठे जाणार हे जग ! मृत्युच्या, विनाशाच्या भयानक व अज्ञात कड्यावरून ढकलले जात असलेले जग पाहिले म्हणजे कशी निराशा उद्भवते? सुख साधनांचा खच आहे पण सुख नाही. ज्ञानाचा, वाङमयाचा सैतानी कारखाना सुरू आहे, पण ज्ञान नाही. देशभक्तिच्या व्याख्यानाच्या फैरी झडत आहेत पण देश उत्थीत होत नाही. समाज सेवकांच्या झुंडीच्या झुंडी उठत आहेत पण समाजाचे पतनाच्या गर्तेत थडगे उभे होत आहे. काळोख निराशा, पण थांबा. या अशाच प्रसंगी साधुसंतांनी प्रकाशदीप लावला व मार्ग दाखवला. तोच संतधर्म होय. संतांचा धर्म आचरावा, सारे किटाळ नष्ट होईल. सारी विषण्णता नष्ट होईल. असा हा संतांचा धर्म आपण समजावून घेऊ. संतधर्माचे कार्य आहे मानव व समाज दिव्य करणे. यासाठी त्यांनी शोधले. नाना समतावादी सुधारणा अभ्यासल्या व निष्कर्ष काढला की संतांचा धर्म सांभाळला तरच भ्रष्टता, दैन्य, दुर्भिक्ष दूर होईल. पौरूष जागेल. मृतत्व नासेल. जीवन सतेज, सचेत होईल. तो धर्म आहे शुचिता ! शुचिता हा संतांचा सर्वंकष पाठ आहे. धीर, विराग, सेवा हे आचाराचे बीजमंत्र होत. शुचिता शिका. समाजात शुचिता आणा. शुचितेवाचून सारे नष्टचर्य उगवले आहे.




Comments