माऊली ज्ञानाई
- shashwatsangati
- Jul 23
- 1 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

प्रत्येक वेळी ज्ञानाची पातळी सारखीच असावी किंवा असते असा आमचा समज नाही, ज्ञान अनंत आहे. ते पूर्ण झाले असे समजणे म्हणजे ज्ञानाच्या धर्मास बांध कळूच शकत नाही असे आमचे मत नाही. जे ऋषींना दिसले से खरेच आहे. पण त्यापेक्षाही सुस्पष्टता पुढे घडली आणि म्हणून ज्ञानोबांची ज्ञानाकाशातील झेप व त्यांची अनंतत्वात झेपावणारी प्रतिज्ञापूर्ण प्रज्ञा, मागीलांच्या ज्ञान प्रमाणाचे रज्जूने आम्ही बांधून अडवू इच्छित नाही, कारण जे त्यांनी सांगितले ते मागच्याश धरून आहेच, पण त्यात पुढे काही नाविन्याचा झोत आहे. एतदर्थ मागे जर त्यांचे म्हणणे कोणी सांगितले नसेल तर ते अप्रमाण आहे असे आम्ही म्हणणार नाही. उलट ज्ञानराजांचे सांगणे मागीलांच्या पुढचे आहे. मागच्या लोकांना अज्ञात असलेल्या काही दिव्य प्रमेयांची उकल ज्ञानदेवांनी केली आहे, असे म्हणण्याचे साहसच माऊलीला शरण जाऊन मी करणार आहे. हा प्रमाद आहे खरा! पण हा प्रमाद आहे असे अज्ञ व मूढांना वाटेल, पण सूज्ञ महर्षी वा ज्ञानराज याला प्रमाद म्हणणार नाहीत, उलट हर्षभराने धन्य धन्य म्हणतील. ज्ञानोबांना सारेजण माऊली म्हणतात, करुणाकर म्हणतात. सारा व्यवहारही मी त्या माऊलीकडूनच शिकलो- ती सांगते तसा मी वागतो. ती जर न बोलेल तर मग माझे जीवन तरी चालावे कसे ? माऊली हाच माझा एकमेव आधार व सर्वसुखाचा, व्यवहाराचा ज्ञानविलासी दाता आहे.




Comments