प्रेम
- shashwatsangati
- Oct 23
- 2 min read
जीवनात भावाचे चांदणे उजाडले म्हणजे श्वास नावाच्या भीमेत त्याचे मोहक बिंब उमटणार व मग आमची श्वासगंगा चंद्रभागा होणार की जी श्रीहरीचे/विठुरायाचे पायाशी सलगीने अखंड वाहत राहील. हा भाव चंद्रमा निरभ्र चित्ताकाशांत आपले कोमल करपाशाने (कर्म) सारे जीवनाचे संकल्प सजवितो, आनंदी करतो. हा भावच या जगात अभावरूप म्हणजे नाहीपणाचे जाणिवेत खेळतो. जे नाही त्त्याचे ज्ञान व्हावे व मग ते सत्य मानावे असा अभावाचे भावाचा खेळ आहे. पण देवाचे घरी जो भाव आहे तो वेगळा. सत्य अनुभवायचे व भाव करायचा आणि ते ज्ञान मानायचे. हा भावच दुर्लभ आहे. भाव म्हणजे निष्ठा. ही निष्ठा जिवंत म्हणजे सक्रिय असावी, सतेज असावी. निष्ठा म्हणजे ज्याचे बाबत आपण निष्ठा आहे असे मानतो त्याचा अभिमान धरणे. तो माझा आहे असे प्राणाचे आतून वाटणे व तसेच सारखे वाटत राहणे. हे शोधण्याकरिता प्रथम आपले आपल्या प्राणावरील प्रेम तपासले पाहिजे. आपले प्राण त्या प्रिय देवासाठी खर्ची करता आले पाहिजे. नव्हे आपले आपल्यावर जेवढे प्रेम आहे ते विसरून त्याचे प्रेमात लीन झालो पाहिजे. नाहीतर प्रेम दोठायी होते. आपले देहाचे सारे प्रेम त्या श्रीहरीचे स्वरूपावर जडावे असे केले पाहिजे. यास्तव त्या देवाला आपले समजावे. ते एवढे की तो नसेल तर मी कसे जगेन ह्या विचाराने बेचैन झालो पाहिजे. ही बेचैनीच पुढे सुयोग्य प्रेम निर्माण करते. त्या प्रिय प्रभूचा सर्वांगाने अभिमान घेणे व वागणे म्हणजेच भक्ती असते. बरेचदा भक्तीचा अर्थ प्रेम असा करतात पण वस्तूतः माणसाचे प्रेम साहंकार धर्म जागा झाल्याशिवाय आकारच धरित नाही. आपले जीवनात सारेच प्रेमाचे धर्म या स्वरूपाचे आहे. अर्थात ज्या पदार्थाचा आपण अहंकार घेतो तो पदार्थ जसा असेल तसे धर्म आपले मध्ये जागे होतात व हे धर्म पुढे निश्चयाने सांभाळीत राहताना प्रेम नावाचा स्वभाव तयार होतो. हेच प्रेम सक्रीय असू शकते म्हणून चांगल्याचा अभिमान धरावा. देवा इतके जगात काय बरे चांगले आहे ? त्यास्तव देवाचा धर्म मधुर सांगितला आहे. तो सुंदर आहे, तो प्रेमळ आहे, तो दयाघन आहे, तो करुणाकर आहे, तो अजेय आहे, तो अजर आहे, तो अमृत आहे. तो निर्विकार आहे, तो निर्विघ्न आहे. तो अनादी आहे. तो सर्वत्र एकच भरून आहे. हे सारे सारे मंगल धर्म आहेत. त्या प्रभूचे साहंकारी आपण व्हायचे आहे जसे की स्वपुत्राचे व्हावे, जसे की स्वपतीचे व्हावे. याहीपेक्षा जसे की स्वदेहाचे व्हावे. हा भाव गोपींचा, गोपाळांचा होता. शुकाचा, ज्ञानराजाचा होता. मीरेचा, सूरदासाचा होता. तुकोबा, नामदेवांचा होता . सकाळ संतांचा हा भाव होता. या सर्व विचारात एकच वीण आहे आणि ती म्हणजे देवाचे आपण एवढे अभिमानी व्हावे की जसे देहाचे! हा अभिमान नित्य चिंतनाने सेवारत राहिल्याने येतो. मग खराखुरा प्रेम नावाचा धर्म जागा होतो.





Comments