top of page

स्वधर्म सांभाळा

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

जड वस्तू जाणीवरहीत असल्यामुळे व त्या निसर्गाशी सहजी सहयोग घडवीत असल्यामुळे त्यांना दुःख प्राप्ती संभवत नाही. परंतु मानव जाणीवेचा असल्यामुळे, तो निसर्गाशी प्रतिकूलता स्वीकारतो व निसर्ग न बदलता आल्यामुळे दुःखरूप होतो. याचाच अर्थ निसर्ग बदलता न येणे यात स्वसामर्थ्य कमी आहे ही जी जाणीव तेच दुःख ठरते. म्हणजेच निसर्गाची योग्य ती प्रवाही स्थिती ही त्याला आकलन होत नाही. तेव्हा सुखासाठी ही निसर्ग प्रेरणा काय, कोणाची व कशी ही समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरु होणे हे आवश्यक ठरते. अल्पव्याप्त पदार्थ हा महद्व्याप्त पदार्थाबरोबर फिरविला जाणे हा स्वभाव व निसर्ग आहे. पण या दोन घटकात जर विरोध असेल तर दुःख व प्रेम असेल तर सुख निर्माण होते. पण जर अल्पव्याप्त हा महद्व्याप्तीपासून दूर झाला तर तो निश्चित दुःखी होणार व सुखी होण्यासाठी त्या केंद्राशी युती घेणे आवश्यक आहे. मानव हा ईश शक्तीचा घटक आहे. तो काळशक्तीने अलग झाला व विभक्त झाला. विभक्ती करणारे त्यावर आक्रमण झाले व तो दुःखी झाला. तर तो पुनःश्च मूळ शक्तीशी वा महद् व्याप्तीशी जेवढी युती वा संबंध राखेल तशी काल आक्रमकता कमी होईल. काल हाही परमेश्वराच्या आज्ञेने त्रिविध अवस्थेनी विश्वाची घडामोड करणारा शक्तीमान भावच आहे. तेव्हा कालातिक्रमण होण्यास्तव घटकाला अधिष्ठानाविषयी प्रगाढ प्रेम हवे. प्रेमतंतू काळातून विरुद्ध प्रवाही होऊ शकतो व हा तंतू अधिष्ठानाशी संबंधीत होताच ईशशक्ती काळाचेच साहाय्याने मानवाला वा जीवाला शक्ति प्रदान करते व काळावर मात करण्यापेक्षा त्याच्याच माध्यमातून अधिकाधिक संबंध ईशशक्तीशी घेतो.

ईशशक्तींनी पदार्थाची निर्मिती होते व आपला संबंध पदार्थाशी येतो. पण हा संबंध ईशप्रेम या न्यायाने घेता न आल्यामुळे गुणसापेक्ष व धर्मसापेक्ष खंडशः होऊन ईश्वराचा बोध नासतो व खंडित बोधामुळे ती वस्तूच आक्रमण करते व आपलेच आकर्षण असहाय्यतेने आपल्या दुःखास कारणीभूत होते. पण खंडित बोधाची साखळी जर अखंड झाली, म्हणजेच पदार्थमात्रातून ईश्वराचा बोध घडला तर आक्रमण न होता ते पदार्थ आत्मसात होऊन आपण सुख सागरात ईश्वरीय बोधात आनंदाने विहरु. हा होणारा खंडशः बोध याचा माया हा प्रवाद आहे. कारण दिसतो तो ईश्वरच, असतो ईश्वरच, पण पाहणारी दृष्टी अशुद्ध असते म्हणून या अशुद्धतेला माया म्हणणे युक्त ठरते. ही अशुद्धता काढणे एवढाच प्रांत फक्त शिल्लक राहतो. जर स्वधर्म सांभाळला तर निसर्गावर मात करता येईल. निसर्गाची धारणा सिद्ध पुरुषाचे चित्तात असते.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page