जीवन
- shashwatsangati
- Oct 14
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
एका अपूर्ण घटकातून पूर्णत्वापर्यंतच्या प्रवासाचं जे रुप ते म्हणजे जीवन. जन्म ते मृत्यु ही देहयात्रा. हे सुखरुप कसं होईल हा विचार येतो. परमात्म्याचे सद्यस्थितीतील ज्ञान आपल्याला अंशत्वाने आहे. हे जेव्हा पूर्णत्वाला येईल, आनंदघनाचा जेव्हा प्रत्यय येईल, तेव्हा जीवन समृद्ध झालं असं म्हणता येईल. पण हे जीवन समृद्ध झालं हे अनुभवायचं कुणी? ऊस सुद्धा चावावा लागतो, मग कळतं तो गोड आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, हे आत्मरुप सुख संवेद्य आहे.
विश्वनिर्मिती हे कार्य अज्ञानाचे नसून ज्ञानाचे आहे. जेव्हा भगवंताला आपल्याच स्वरुपाचं ज्ञान झालं तेव्हा विश्व निर्माण झालं. स्वसंवेद्य अवस्थेने मी माझा आहे हे ज्ञान होतं व ज्ञान झालं की संवेद्य (जाणीव) रहीत अशी अवस्था येते. (असतो मीच पण जाणिवेच्या अवस्थेने व्यवहारदृष्टी संवेदना सर्व बदलते. मी माणूस ही संवेदना, मी पिता आहे येथे लुप्त होते.) मी माझा आहे येथे द्वित्व आलं, पण ते सगुण आहे. कारण येथे ईश्वराचा साक्षात्कार आहे मग माया, लीला निर्माण झाली.
चित्रावरुन आपला बोध जेव्हा होतो तेव्हा मी मला विसरतो. मी माझा आहे ही संवेदनाच विसरतो. हा आपलाच विस्तार आहे ही भावना म्हणजे लीला व हा आपलाच विग्रह आहे ही माया.
पतंग आकाशात सोडावा, वाऱ्याने वर जावा, हे होताना सूत्रधार स्वस्थ असतो. त्याला हवा तेव्हा तो पतंग खाली घेणार पण पतंग मात्र इकडून तिकडं झंजावतात. तसेच आपलेही सूत्र आपल्याला सापडत नाही. पण ईश्वरानं ते सूत्र दाखवलं म्हणजे त्या झंझावाताचा त्रास नाही. वारं असेना का पण मी तुला केव्हा उतरवणार याची जाणीव असू दे, असं ईश्वर म्हणतो.
बुद्धीची देणगी त्याने आपल्याला दिली. पशू व माणसातला हा छोटासा फरक. पण संत म्हणतात ही जाणीव तुला देवाने दिली खरी, पण तू आहेस तो तू वेगळा आहेस. तो म्हणतो तू, तुझा जीव. परमेश्वर जेव्हा भावाविष्कृत होतो तेव्हा अस्तित्व ईश्वराचं, प्रतीति ईश्वराची. हा भाव आहे तो तू आहेस. म्हणून संत म्हणतात, भाव धारण करा. जीवन जे ईश्वराने दिले ते नाकळतं झालं कारण भाव शून्य झाला.
जीवन हा टप्पा, हे त्यांनी ओळखलं व तेच समृद्ध करा. जेव्हा अंतर्गत ज्ञान होतं तेव्हा 'मी'चं ज्ञान यथार्थ झालं तर हर्ष होतो. मग दुःख नाही, सारे सुख दुःखाचे विकार, विलाप मावळतात.




Comments