भजन
- shashwatsangati
- Nov 20, 2025
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
भजनाची व्याख्या करताना समर्थांनी म्हटले आहे की -
भेटो कोणी एक नर । धेड महार चांभार । त्याचे राखावे अंतर । या नांव भजन ।।
सर्व अनाथ - अपंगांसाठी परमेश्वराची करूणा भाकणे म्हणजे खरी भजन करण्याची कला शिकणे होय. पुष्कळदा आपण करूणापर अभंग म्हणतो. आपल्यासाठी आपण ईश्वराची करूणा भाकतो. पण अशावेळी आपण नेमके काय करतो ? आपण करूण होतो म्हणजे दीनवाणे होतो. करूण होणे म्हणजे आक्रंदन करणे, दीनवाणे, केविलवाणे होणे, रडणे असे आपण समजतो. आणि या प्रकारच्या भाव प्रकटनामुळे, कारुण्य नावाचा जो पदार्थ आहे, तो आपल्या हृदयात उठत नाही. दीनवाणा धर्म आपल्या हृदयामध्ये जागा होतो. करूणा हा थोरांचा धर्म आहे. आपल्याला करूणा ही आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाची येऊ शकते. पण कमी प्रतीच्या माणसाला श्रेष्ठ माणसाची करूणा येणे शक्य नसते. समाजात असेच चित्र दिसते. म्हणून लक्षात घेतले पाहिजे की करूणा हा श्रेष्ठांचा धर्म आहे. करूणापर अभंग म्हणणे याचा अर्थच असा आहे की जो करूणावंत आहे, त्याला आळविणारे अभंग म्हणणे. परमेश्वराच्या कारूण्याला आवाहन करणारी क्रिया करणे म्हणजे भजन करणे होय. कारूण्य ही एक अत्यंत मोठी थोर शक्ती आहे. परमेश्वराच्या कारूण्यातूनच हे सारे विश्व निर्माण झाले आहे. 'सह नाववतु । सह नौ भुनक्तु ।' ही विश्वातील सहयोगी जीवनाची धारणा म्हणजे परमेश्वराच्या कारूण्याचीच अवस्था आहे. 'सह नाववतु ।' ही काही नीती किंवा नियम नव्हे ! वेदाच्या ह्या मंत्राने परमेश्वरी कारुण्याची निसर्गसिद्ध व्यवस्थाच प्रकट केली आहे. अशा ह्या थोर कारुण्याला साद घालणे, आवाहन करणे यासाठीच भजन आहे. या वेदमंत्रात एका अनादिसिद्ध पुरुषाचे थोर कारुण्य दडून आहे. परस्परांच्या सहयोगात परस्परांचा उत्कर्ष दडून असतो. ही निसर्गसिद्ध व्यवस्थाच वरील वेदाचा मंत्र प्रकट करतो. देवाचा हा निसर्ग माणसाने आपल्या कर्मांनी फुलवायचा असतो. माणसांना भूक लागते म्हणून वृक्षांना फळे येतात. निसर्ग फुलतो व फळतो ! दुसऱ्याच्या आहारासाठी तिसऱ्याने उगवायचे ! निसर्गातील या सहयोगी जीवनालाच 'जीवो जीवस्य जीवनम् ।' ही संज्ञा आहे. म्हणून कारूण्यभाव हा भक्तिशास्त्राने फार मोठा सिद्धान्त मानलेला आहे. 'तस्य कारूण्य भावः ।' म्हणजे त्या परमेश्वराचा करूणा हा स्थायी भाव आहे असा हा भक्तिशास्त्राचा सिद्धान्त आहे. म्हणजे परमेश्वराचे जे जे करणे आहे, ते सारे करूणाभावाचेच प्राकट्य आहे. सृष्टीची निर्मिती ही सुद्धा त्याच्या कारूण्यातूनच झालेली आहे. म्हणून हा करूणाधर्म आपल्यामधे जागा करणे म्हणजे भजन करणे होय. मग ते भजन गीताद्वारे, व्रताद्वारे, सेवेद्वारे अशा कोणत्याही माध्यमाद्वारे तुम्ही करा. पण ही करूणा तुम्ही आपल्यात भजनाद्वारे जागृत करा. यासाठी प्रथम आपल्यामध्ये सामर्थ्य आणावे लागेल. त्यासाठी तपस्या करावी लागेल. भजनभाव याचा अर्थच असा की दीन, अनाथ, अपंग, अजाण, अज्ञानी, संकटग्रस्त, व्याधिग्रस्त असे जे कोणी असतील या सगळ्यांच्या सेवेसाठी आपण उपयुक्त ठरले पाहिजे. 'जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।।' अशा वृत्तीचा आविर्भाव जेव्हा आपल्यामध्ये होईल, त्यावेळीच भजनांची सुरुवात आपल्यामध्ये झाली आहे असे समजावे. भजन म्हणजे काही करमणूक नव्हे. म्हणून गीत-गायन हा जरी एक चांगला उपक्रम असला, तरी त्यातून खरे भजन घडले पाहिजे.




Comments