प्रार्थनेचे महत्व
- shashwatsangati
- Nov 6, 2025
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

प्रार्थना करीत असताना आपण सर्वव्यापक परमेश्वराला का आळवतो ते हे कळण्यासाठी त्यात हृदय ओतले पाहिजे. त्यासाठी काही संकेत हृदयात असावा. चित् शक्तीचा अविष्कार व्हावा असा संकेत असावा. पोराच्या हाकेतील करूण हृदय आपल्या हृदयात असावे. त्यामुळे विकास होऊ शकेल. हृदयात विशिष्ट अविष्कार करायचा आहे. प्रेमपूर्ण निरामयता असल्यास परमेश्वराची अनुभूती येऊ लागेल. प्रार्थना हृत्पटलावरील विक्षेप आवरण दूर करते. अशी प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थना करणे नसून प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थनेत स्वाभाविक अविष्कार झाला पाहिजे नाहीतर प्रभूचा संकेत कळणे कठीण. परमेश्वराच्या संकेताची हाक आपल्या हृदयाच्या पवित्रपणाकरीताच आहे. त्याकरिताच प्रार्थना पाहिजे. हृदय निर्मळ करणे हेच ध्येय असावे. विश्वातील अणूपरमाणूतील परमेश्वराच्या अस्तित्वातील सर्व जीवांविषयी कळकळ निर्माण झाली पाहिजे. परंतु हल्ली हे कुठेच शिल्लक राहिले नाही. हे सर्व हृदयाच्या अमंगलत्वाचे दर्शन होय. जे करावे ते अपात्रच होते असे दिसून येते. परमेश्वरीय अर्थ परमेश्वराच्याच कृपेने प्रार्थनेने प्राप्त होतो. सर्व हृदयांचे एकत्व प्रार्थनेतून होऊ शकेल. यापुढील पायरी म्हणजे धारणा शक्तीचे जागरण. विचार धारण करण्याकरता धारकत्व पाहिजे. परमेश्वरीय प्रेम, आस्था निर्माण झाली पाहिजे. धारणाशक्ती शिवाय दिव्यशक्ती अवतरू शकणार नाही, त्याकरिता हृदयाचे निर्मळत्वच पाहिजे. मानसशास्त्रातून असे सिद्ध होते की ५० वर्षात विकृत मनस्थितीमुळे माणूस माणसाला खाऊ लागेल. हे सर्व निसर्गावर अवलंबून आहे. मनुष्याची हीन दीन, भीरु अशी भीषण मानसिक अवस्था होणार आहे. म्हणून या परिस्थितीला आवरले पाहिजे. तरच सुख निर्माण होऊ शकेल व या भूतलावर परमेश्वराचे निर्माण होऊ शकेल; ज्याप्रमाणे प्रभू गोपाळकृष्णचा जन्म झाला. प्रभू निर्माणाकरता सत्वगुणाचे अधिष्ठान पाहिजे. आज तर तमोगुणाचेच प्राबल्य आहेत. दिव्यत्व धारण करण्याकरता पृथ्वीतलावर धारणा शक्ती पाहिजे. परमेश्वराचे निर्माण होऊन त्याचे सान्निध्य मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते पण त्याप्रमाणे पृथ्वीला आपली लायकी योग्य केली पाहिजे. निर्मळ हृदयाच्या जवळ जवळ परमेश्वर येऊ लागतो. परमेश्वरीय सामर्थ्याकरता स्त्रियांमध्ये ही धारणा जास्त झाली पाहिजे. परमेश्वरीय भक्ती स्त्रियांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आपल्यापुरते आपल्या परिसरामध्येच न बघता सर्वांच्या कल्याणाकरिता कार्य केले पाहिजे. परंतु हल्लीचे विकृत ज्ञान असल्यामुळे असूरी संपदाच निर्माण होते. हल्ली स्त्रियांना अध्यात्मिक स्वातंत्र्य नाही. भारतीय स्त्रिया जर हा आदर्श दाखवतील तर इतर देशातही हे होऊ शकेल.त्याकरता जागृती करण्याकरता प्रार्थनेच्या प्रत्येक वेळेला कुणीतरी काहीतरी सांगावे. दुर्बलतेमुळे माणसे परमेश्वराच्या भक्तीला पारखी झाली आहेत. परमेश्वर म्हणजे काय याचे ज्ञानही कुणाला नसता निव्वळ शब्द मात्र उरलेत. आपापल्या अभिरुचीप्रमाणे प्रत्येक जण वागू लागला आहे. जे योग्य आहे ते स्वीकृत करण्याचे स्वाभाविक धाडस झाले पाहिजे. आपण नाटक सिनेमाला निर्भयपणे जातो. कारण समाजात ते प्रतिष्ठित समजले गेले आहे. देवळात जाताना मात्र चार लोक बघतील म्हणून आपण भितो. वास्तविक सत्कार्याकरता निर्भय, निर्भीड वृत्ती झाली पाहिजे. पण हल्लीचा प्रवाह उलटा आहे. विचार प्रवृत्तीच बदलली आहे. भारतीय संस्कृतीचा ठाव ठिकाणच कोणाला माहित नाही. ब्रिटिशांची संस्कृतीच आपली वाटू लागली आहे. भारतीय संस्कृती म्हणजे कोणाचेही सामर्थ्य कोणाच्याही बलात्काराने विच्छेदिले जाऊ नये अशी आहे. बंधन जुगारण्यासाठी परमेश्वराची प्रीती पाहिजे तरच त्याच्या सेवेत निर्भयत्व येऊ शकेल. परंतु यासाठी मने पवित्र व बलवान झाली पाहिजेत. परमेश्वराच्या आवडीने परमेश्वर आपल्याला आवडता झाला पाहिजे. परमेश्वराच्या सान्निध्याने जीवन मंगल करा. एकच हृदय जरी पावन झाले तरी बरेच कार्य होईल. आज कोणाला दुसऱ्याचे सुख बघवत नाही. हे निकृष्ट मन बदलण्याचे कार्य प्रार्थनाने होईल. परमेश्वराला आपल्या मनात स्थिर करण्यासाठी व त्याची शक्ती आपल्यात निर्माण होण्याकरता प्रार्थना करावी. ध्येय लक्ष ठेवावे म्हणजे आपल्यात कलह होणार नाही. आध्यात्मिक स्वातंत्र्य म्हणजे दिव्य कर्माला - सत्कर्माला सहकार असावा, प्रतिकार नसावा. प्रपंचातून तुम्ही परमेश्वरापर्यंत जावे अशी इच्छा प्रार्थना त्या प्रभूचरणी मी करतो.



Comments