कुंडलिनी जागृती
- shashwatsangati
- Dec 7, 2025
- 3 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
बरेचदा कुंडलिनी जागृत करणारे गुरु आढळतात. तो अधिकार आहे; पण तेही पूर्णतः या मार्गात अधिकारी नसतात. यामुळे साधकाच्या प्रारब्धावर त्याला ते सोडून देतात. असे कितीतरी साधक केवळ या अनुचित व अशास्त्र जागृतीमुळे अत्यंत कामी, जीर्ण रोगाने पछाडलेले पाहावयास मिळतात. कुंडलिनीस उचित मार्ग देण्याची प्रक्रिया त्यांना ज्ञात नसते व शक्ती सर्व करील अशा भाबड्या कल्पनेच्या आहारी ते जातात. शक्ती सर्व करते; पण ती ही कुंडलिनीशक्ती नव्हे की, जी मूलाधारी आहे. परासंवित कुंडलिनी वा ऊर्ध्व कुंडलिनीचा पात असेल, तरच शक्ती सर्व काही करू शकते. कारण की या शक्तीच्या ठायी प्रज्ञा व ज्ञान नांदत असतात. मूलाधारकुंडलिनी ही अत्यंत प्रभावी शक्ती खरी; पण कुंडलिनी-निजा शक्तीचा तो पृथ्वीत तत्त्वनिष्ठ मूळाच्या अपेक्षेत स्थूल प्रभाव होय. तिला ऊर्ध्व करण्याचेही हेच कारण की, ऊर्ध्व होताना ती ज्या मार्गाने अनेक शक्तिकेंद्रे निर्माण करीत आली, त्या त्या शक्तीशी समरस होऊन उत्तरोत्तर दिव्य प्रभावाने मुळात स्थानापन्न व्हावी. अधः कुंडलिनी शक्तिपातात कधीच पूर्ण जागृती होत नसते. ती अल्पशः जागृत होते व क्रमशः उचित मार्ग मिळाल्यास, उर्ध्व होते. फक्त बलवान, परात्पर अवधूतरूप गुरुशक्तीचा प्रभावच पूर्ण कुंडलिनी जागृत करू शकतो.
'अवधूत पद' सर्वोच्च पद आहे. ते जीवन्मुक्तांचे, अस्पर्श योग्यांचे महायोगपीठ आहे. (सि. सि. प. षष्ठोपदेश पहावा.) अधः कुंडलिनीला द्विधा जाणतात. सृष्टिव्यापक व व्यष्टिप्राण ही ती दोन रूपे होत (सि. सि. प. ४.२२). आमचे तर असे म्हणणे आहे की, मानवांचे सर्व रोग केवळ उचित मार्ग न मिळाल्याने कुंडलिनीच्या होणाऱ्या अस्ताव्यस्त व विपरीत प्रवाहप्रवेशामुळेच असतात. धार्मिकांतच कुंडलिनी असते असे थोडेच आहे. शोक, हर्ष वा आनंदाचा उमाळा केवळ धार्मिक गोष्टीनीच होतात असे नाही. ज्यांच्यात भावना, मनोव्यापार व वीर्य आहे, त्या सर्वांच्या जीवनात कुंडलिनीचे कोणत्यातरी निमित्ताने अल्पांश जागरण उद्भवू शकते. धार्मिक जीवांना होणारा आनंद कीर्तन, जप, भजन वा तत्सम साधने यामुळे होतो व तो बराच काळ टिकतो, सामान्य लोकांत तेवढा दिव्यानंद दिव्य साधनांद्वारे नसला, तरी अल्पतः तत्सम सुखाचा भावनाशील प्रसंग करुणा, अश्रूउद्रेकादी प्रसंग येतातच. हा साधनांच्या अवस्थेत व आनंदाच्या स्तरांत भेद असला, तरी जातीचा फरक नसतो. कमी-अधिक प्रमाणभेद असतो. हा भेद मान्य केला, तरी मिळणारा आनंद खरेपणाने देहातील कोणत्या दिव्य शक्तीच्या उदयात उदित झाला आहे हे जाणण्यामध्ये दोघेही आंधळे असू शकतात. धार्मिकांत संयमशीलता व ईश्वरनिष्ठा प्रखर असेल, तर अचूक तो प्रकार व त्याचा उचित तो मार्ग कळण्याची व्यवस्था आतूनच होऊ शकते. तथापि अज्ञानात जर कुंडलिनीचे अल्पांश जागरण घडले, तर तिचे तप्तप्रवाह जेथे प्रवेशतील, तेथे व्याधींचा आभास निर्माण होतो. जागृतीनंतर हे तप्त प्रवाह मिळेल त्या मार्गाने मेंदूकडे वर चढतात. थंडी व उष्णता यांना जिरविणे वा निर्माण करणे हे या शक्तीचे प्रस्फुरणधर्माने अंगच असते. अशा तप्त प्रवाहाचा प्रवेश आतड्यात झाला, तर आतडे प्रथम गरम होते. भुकेची वासना जागी होते. माणूस खातोही, पण ती तशीच काही दिवस तेथे राहिली, तर मलबद्धता, अॅपेण्डिसायटिस, कावीळ इ. आतड्याचे रोग होऊ शकतात. ही कुंडलिनी अल्पजागृत असल्याने एकाच ठिकाणी राहील असे नाही. ती जर छातीत शिरली, तर हृदयरोगासारखे विकार उद्भवतात. मेदूंत शिरली, तर घेरी येणे, कळमळणे, भणभणणे, डोकेदुखी जडणे, ताण पडणे, विस्मरण होणे, दाह होणे, एवढेच नव्हे, तर वेड लागणे येथपर्यंत मजल जाते. दमा, हर्निया यासारख्या रोगांचाही उपद्रव यामुळे होऊ शकतो.काही काही साधक अशा प्रकारच्या जागरणामुळे अशक्त होतात, वाळतात, उत्साह उल्हास गमावून बसतात. दिवसेंदिवस शक्ती क्षीण होऊन यष्टी बारीक होऊ लागते. निद्रा नाश पावते. झोप येईनाशी होते. याचे कारण एकच की, अल्पजागृत कुंडलिनी कामकेंद्राद्वारे स्खलन पावते. अशाप्रकारे तिचा ऱ्हास झाल्यास मृत्यूलाच आमंत्रण करण्यासारखे होईल. अलीकडे सर्वत्र आढळणारे वेड्यांचे वाढते प्रमाण, निद्रानाशाचे रण व रोगांचे थैमान यांचे कारण शोधले पाहिजे. मुळातून हे रोग दूर हटविण्याचा एकमेव मार्ग आहे जागृत कुंडलिनीस उचित मार्ग देणे, अर्थात सुषुम्नाद्वारे ती ऊर्ध्वगती करणे हा। कदाचित यामुळे असाही समज होईल की, कुंडलिनीजागरण ही एक महाव्याधी आहे; पण हे खोटे आहे. कुंडलिनी जागृती हे परमभाग्य आहे. हा लाभ कोणास, केव्हा व कसा होईल हे सांगता येत नाही. तथापि याबाबतचे प्रगाढ अज्ञान हा मात्र एक भयंकर रोग आहे. धार्मिकांना तर विनंती करून सांगावेसे वाटते की, तुमच्या सर्व प्रवृत्ती कुंडलिनीच्या आश्रयानेच उद्युक्त असतात. कुंडलिनी म्हणजे दिव्यजीवनलाभार्थ प्रभूची देण आहे. तिचा व शिवाचा एकरससंभव आहे. योगाच्या या प्रकरणाची घृणा मानणे म्हणजे प्रत्यक्ष आपल्याच उपास्याचे विडंबन होय हे ध्यानात घ्यावयास हवे. कुंडलिनीजागृती परमभाग्याने होते; पण उचित मार्ग न मिळाला, तर मात्र प्रकृतीच्या गुणाप्रमाणे तिचा सर्वत्र धिंगाणा पहावयास मिळतो. तिन्ही गुणांच्या जीवांची ही शक्ती जागृत होणे संभवनीय आहे व प्रत्येक जीवांत कमी अधिक प्रमाणांत या तिन्ही गुणांचे अस्तित्व असते. कुंडलिनी जागी झाल्यावर ती या गुणांच्या स्वभावाप्रमाणेच शक्तिरूप होऊन खर्ची पडत असते. तम, रज व सत्त्व या तीन गुणांत तमः कुंडलिनी, रजः कुंडलिनी व सत्त्वचकुंडलिनीचा विहार सुरू होतो. या गुणांच्या आत या शक्तीचे रूप आवडी व इच्छा वा उद्युक्तता या धर्माने ओळखता येते.



Comments