मृत धर्मभावना
- shashwatsangati
- Dec 20, 2025
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
भारतीय माणसाला धर्मविषयक विचारांचे बाळकडू लहानपणापासूनच मिळालेले असते. भारतीय जीवनपद्धतीच धर्माधिष्ठित आहे. आपल्या धर्मात अनेक संप्रदाय आहेत, शाखोपशाखा आहेत. व्यक्तिगत, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या सर्वच क्षेत्रात धर्मानुगामी व्यवस्था असावी असे भारतीयांना वाटते. पण असे असतानाही आज प्रत्यक्ष परिस्थिती काय दिसते ? धर्मविषयक भावनात्मक आस्था असूनही, त्याच्या प्रत्यक्ष आचरणासंबंधी मात्र अनास्था दिसते. धर्माच्या संबंधात आपण भारतीय लोक भावनेने आस्थेवाईक आहोत पण सक्रिय दृष्ट्या मात्र आपण अनास्थापूर्वकच आहोत. म्हणजे आपण धर्माचा प्रत्यक्ष जीवनाशी नाते जोडण्याचा प्रयोग करीत नाही. माणसाला राहायला घर पाहिजे असते पण ते बांधण्यासाठी करावयाचा उपद्व्याप व कटकट मात्र नको असते. तसे आपले धर्माच्या बाबतीत झाले आहे. म्हणजे आपली धर्मभावना ही मृत झाली आहे. धर्माचा सजीव भाव आपण स्वीकारीत नाही असेच सर्वत्र दिसते. जोपर्यंत धर्माचा केवळ भावनात्मकतेनेच विचार होतो, तोपर्यंत तो मृत धर्म आहे. धर्मानुसार जीवन घडविण्याची प्रत्यक्षनिष्ठा जर जागी झाली, तरच धर्मभावना सजीव होते. हे लक्षात घेतले पाहिजे. भावना ही निर्गुण असते. प्रत्यक्षाचरणाने ती सगुण करावी लागते, साकार करावी लागते. या भावनेसाठी आपले जीवन संकलित करणारी अशी एक दिव्य निष्ठा जर आपल्यामध्ये जागी झाली, तर ती भावना सजीव होते. 'आई' या शब्दाने उचंबळणारी मनातील प्रेमभावना जर प्रत्यक्ष व्यवहारात साकार झाली, तरच आई शब्दाला सजीवता येते. तरच प्रेमाची भावना साकार होते व आई शब्दाचा खराखुरा अर्थ कळला असे प्रकट होते. अन्यथा आईबाबत नुसती प्रेमाची भावना राखून, व्यवहारात जर ती सालंकृत झाली नाही, तर ती भावना मृत आहे असेच म्हणावे लागेल. आज आपल्या धर्मभावना, भक्तिभावना अशाच मृत झालेल्या आहेत. धर्माबाबत नुसत्या मृत वल्गना सर्वत्र पाहायला मिळतात. भावना वाईट असतात असे नव्हे, पण भावना व आपण यामध्ये जीवनाचा जो काही प्रत्यय आपण घेतो, त्यासाठी जीवन झिजविण्याची काही व्यवस्था आपण स्वीकारली पाहिजे. भावनांचा अवलंब प्रत्यक्ष जीवनात करण्यासाठी निष्ठा आवश्यक असते. त्यासाठी काही कष्ट घेण्याची आवश्यकता असते.




Comments