कालशक्तीवर मात करा
- shashwatsangati
- Feb 16
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
काळाचा अखंड प्रवाह जन्ममृत्यूच्या अवस्थेने खंडित होऊन त्रिकाल या संज्ञेस पात्र झाला. आणि काळाचे अखंडत्व न कळल्यामुळे, जीव कालस्वरूप असून खंडितपणाने राहू लागला. वास्तविक काळाच्या व्याप्तीएवढेच व आयुष्याएवढेच दीर्घायुष्य व सर्वव्याप्त जीवाचे स्वरूप आहे. परंतु काळाच्या निर्मळपणाला व शुद्धतेला तो विसरला की, ज्यामुळे त्याच्यावर कालशक्तीचा आघात सुरु झाला. या कालशक्तीच्या आघाताला साहण्याची व प्रतिकार करण्याची शक्ती जीवाला राहिली नाही. कारण तो देहोपाधिक कालस्वाधीन जडवस्तूचा भोक्ता होऊन देहाहंकारी बनला. एवढेच नव्हे तर तो देह म्हणूनच मिरवू लागला. त्या देहाहंकाराची राख झाल्याशिवाय जीव कालाच्या मगरमिठीतून सुटणे अशक्य आहे. देहसंबंधामुळे तो जीव बदनाम व दुर्बल झाला. नित्य देहस्मृती व दैहिक सुख देहरक्षणास्तव भोगताना, त्याच्या व्यापक स्वरूपाला तो मुकला आणि त्याला स्वगृहाकडे काळाला चुकवून वा जिंकून जाणे कठीण झाले. कोणत्याही शक्तीचा आघात सहन करावयाचा असेल वा तिचा प्रतिकार करावयाचा असेल, तर त्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ शक्तीची मदत होणे आवश्यक असते. हा साधा नियम आहे. कालशक्तीवर मात केल्याशिवाय, जीव आपल्या मूळ स्वरूपाच्या सामर्थ्याला येऊ शकत नाही. म्हणून आपल्या मूळ स्वरूपाचे नित्य स्मरण सेवन करणे आवश्यक आहे. जीव आत्मभावाशी रत झाला म्हणजे कालस्वाधीन वस्तूचा अस्वीकार सहजच घडेल आणि देहाहंकाराचा नष्टपणा आत्मसेवनामुळे नाहीसा होऊन आत्माहंकार वाढू लागेल. काळ सुद्धा आत्म्याच्या संकल्पाचा विहार आहे. म्हणून काळाची वक्रदृष्टी नाहीशी होऊन, साधक कालस्वरूप होण्याला अधिकृत होतो. ज्या स्थितीत आपण नित्य काळ कंठतो, त्याही स्थितीत ममत्वाच्या अहंकार सेवनामुळे तो प्राप्त होत असतो. आत्मस्थितीत भाव दृढ होऊ लागला तर ज्याचा भाव त्याला 'आत्मोऽहं' असेच जाणू लागेल. आत्मवस्तूचा व्याप काय वर्णावा ? कारण आत्माच सर्व आहे. अर्थात् साधक जसजसा आत्मभावाशी प्रेमाने समरस होईल, तसतसा तो व्यापक होऊ लागेल. बुद्धीचे बोधव्य अत्यंत निश्चयाला प्राप्त होईल व वृत्ती आत्मसुखाला मोह पावून, तेथेच वारंवार स्थिर होऊ लागेल. साधकाच्या स्वानंदात प्रेमाचा गाभा असल्यामुळे, आत्मीयत्वाचा व्यवहार सर्वत्र सुरु होतो. विकार नकोसे झाल्यामुळे ममत्वरहित प्रेम साधकाला प्राप्त झाले आणि अनासक्तयोगाचा अभ्यास साधकाला घडू लागला. त्यामुळे काळाचे वर्चस्व, आत्मरती अवस्थेमुळे बरेच कमी झाले. ज्या प्रमाणात साधक आपल्या देवाशी वृत्तिभावाने समरस होईल, त्या प्रमाणात देवपणा त्याच्यामध्ये जागृत होईल.



Comments