श्रम
- shashwatsangati
- Jul 2
- 1 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

श्रम करणारी माणसेच श्रेष्ठतेस पावतात. ईश्वरदत्त सामर्थ्यांचा उचित परिश्रमाद्वारे उपयोग करुन, जो सृष्टीचे वैभव वाढविण्यास साह्यभूत होतो असा मनुष्यच देवाला प्रिय होतो. कारण श्रम ही विश्वाची जननी आहे. विश्वात मंगलकारक व उच्चतर अवस्था निर्माण व्हावयास शारीरिक, मानसिक व बौद्धीक अशा श्रमाचा यज्ञ, निरंतर चालू असावा लागतो. अशा पवित्र विश्वनिर्मितीस जो आपल्या जीवनांतून सहाय्यभूत होतो म्हणजेच यज्ञकर्म आचरतो, तोच देवाला आवडतो. श्रमशील, परोपकारी व विरागी अशा मनुष्याचीच देव इच्छा करितात. निर्लोभ वृत्तीने आपला कर्मवाटा अनालस्यतेने उचलणें, हेच वैराग्याचें दर्शन आहे. असा मनुष्य स्वभावेच समाजहितासाठी राबणारा, झिजणारा असा परोपकारी असतो. अशी माणसे म्हणजे कुठल्याही राष्ट्राचे सामर्थ्यच होय. आळशी मनुष्य देवाला कधीच प्रिय होत नाही. आपल्या अकर्मणेंच्या पापानें तो श्रमिक सृष्टीचा गुन्हेगारच ठरतो. आळसामुळे होणारे कालापहरण हेच सर्व दुःखाचे मूळ आहे.
‘आपल्या सर्व दुःखाचे मूळ, आपल्याला दुःखाचा विचार करायला जो वेळ मिळतो, तेच आहे' असे स्वामी विवेकानंदही म्हणत असत. निद्रा आलस्य सुस्ती यामुळे माणसात तमोगुणांचे प्राबल्य होते, तो भोगवादी आत्मविन्मुख होतो. यांतून मानवी जीवनातील, दुःखाची न संपणारी मालिका सुरु होते. अस्वस्थता, नानाप्रकारच्या आधिव्याधि, व्यथा अशा प्रकारच्या शिक्षा देऊन, देव आपल्याला या पापापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. परमेश्वर स्वतः नित्य जागृत, श्रमिक कार्यमग्न म्हणजे, 'अतन्द्र' आहे. अखंड परिश्रम हेच त्याचे स्वरुप आहे. तेव्हा आपल्या नित्य चेतनायुक्त व यज्ञकार्यनिमग्न जीवनानें भगवद्प्रिती संपादन करणे, हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे.




Comments