आकार विनाशी आहेत
- shashwatsangati
- Jul 16
- 1 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
वास्तविक सर्व जग एका परमात्म्याचेच प्राकट्य आहे. कारण आकार वा वस्तू घडवावयास जे द्रव्य लागते, ते मूल द्रव्य चेतनेशिवाय म्हणजे परमात्म्याशिवाय दुसरे असणेच संभवत नाही. सकळ निर्माणाचा क्रम लक्षावा वा शोधावे, तर शेवटी एकच एक चिरंतन प्रभूतत्त्व उरते. याचाच अर्थ असा की, जे सर्वांचे आदी असेल तेच सर्वत्र आहे. इतःपर दुसरे द्रव्यच नाही. प्रभूनेच स्वेच्छेने हा जगत् पसारा उभा केला आहे. मग जर आत्माच सर्व काही झाला आहे व तो नित्य चिरंतन व अविनाशी आहे, तर त्याच्यापासून झालेले व त्यानेच व्यापलेले जे विश्व ते विनाशी कसे? असा प्रश्न निर्माण होतो. आत्मतत्त्वापासून जर काही वेगळे नाही व तोच ओतप्रोत भरला आंहे आणि तो तर शाश्वत आहे, तर मग त्याचेच प्राकट्य हे विनाशी कसे? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. याचेच उत्तर आपल्या लक्षात आले म्हणजे, आकार विनाशी आहे हे सप्रमाण सिद्ध होणार आहे. हा मोठा मार्मिक प्रश्न आहे म्हणूनच, त्याचे उत्तरही सकळ वेदान्तशास्त्राचे मर्म आहे व वर्म आहे. देह हा स्वतंत्र नसल्यामुळे त्याचा कोणीतरी धारक असावा लागतो व तो धारक ‘देही’ या नावाने जाणतात म्हणजे मी आत्मा आहे ही ‘मूलभूत’ धारणा होय. म्हणजेच जो देही तो आत्मपुरुषच होय. मग देह काय आहे तर देह म्हणजे या आत्मपुरुषाचे संकल्प, वेदना. या संकल्पने स्वतःचेच प्रसरण केले व देहरुपात अवस्था घेतली. जेथे प्रसरण आले तेथे संकुचन स्वभावानेच संभवते. याचा अर्थ एवढाच की दिसणारा परमात्मा असणाराच असतो. पण दिसणेपणा थांबला की तोच नाही असे केवळ भासते. पण याचे कारण एकच की जो आहे त्याचे खरे ज्ञान नसणे.




Comments