कीर्तनभक्तीचे महात्म्य
- shashwatsangati
- Apr 9
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
प्रेम वृद्धिंगत होण्याकरिता आपल्याला प्रेमाच्या शास्त्राचा व कायद्याचा स्वीकार करणे क्रमप्राप्त ठरते. नित्य संघर्षात निर्मलत्व जेव्हां त्यागपूर्ण भावाने अस्तित्वात असते, त्यावेळेला संघर्षित होणारे घटक एकजीव होत असतात. सहवासाच्या दरम्यान ज्याच्यावर प्रेम करावयाचे, त्याच्या करिताच निःस्वार्थपणे कर्म करावयाचे असते. नदीला जर सागर होण्याची इच्छा असेल तर नदीला आपले नदीत्व-नामरुप अहंकार सागरात हळूहळू विलीन करावा लागेल. भेद आहे तो अल्पशक्ती व सर्वशक्ती हाच आहे. वास्तविक आपतत्त्वाने दोन्हीही एकच असतात. तद्वतच साधकाला पूर्णत्व येण्याकरिता आपला नामरुपालक अहंकार हहूहळू घालवावा लागेल व हा अहंकार प्रेमशक्तीने, प्रेमाच्या प्रक्रियेने सहज स्थलांतरित वा भावांतरित होऊ शकतो. पण प्रेमाच्या विशिष्ट प्रक्रियेने हृदयात एकत्व व साम्य निर्माण होते हे अनुभवांनी व विचारांनी सिद्ध आहे. प्रेमाची प्रक्रिया कशी असावी या संबंधात -
"ददाति प्रतिगृण्हाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम् ।"
हा न्याय आहे. परमेश्वराशी भावविलासात विहार होऊ शकतो. एऱ्हवी त्याच्याशी संबंधित होणे शक्य नाही. भाव हा जरी दिसत नसला, तरी त्याच शक्तीने विश्व-व्यापार स्थिर केला आहे. भावच व्यक्त होतो तेव्हां या जडविशेष इंद्रियांनी आपण व्यक्त दशेद्वारा भाव जाणतो. व्यक्ताचे मोल ठरवतो व गुण जाणतो. हे सर्वच भावाने होते. हा आपला सर्वांचा नित्य अनुभव आहे. तेव्हां देवाला काय द्यावे कारण देवाचेच सारे आहे अशी शंका आल्याशिवाय रहात नाही. तथापि देवाचेच सारे आहे या विषयी आपण निश्चिंत नसल्यामुळे गुरफटून जातो व सुखी अथवा दुःखी होतो. ते कळण्याकरिताच, आणि देवच अवघा आहे हा निश्चय होऊन अनुभव यावा म्हणून 'कीर्तनभक्ती' हा एक रस्त्यातला स्वतंत्र टप्पा आहे.
देवाला आपण भाव द्यावा आणि आपण देवाचे सामर्थ्य घ्यावे. भाव देण्याचे व्यक्त साधन म्हणजे 'कीर्तन'. श्रद्धापूर्वक त्याचे यशगान केले, तर वृत्ती शुद्ध होतात व त्यागमय संकल्प निर्माण करतात. प्रभूच्या निर्विकार अवस्थेचे कीर्तन केल्यास, आपलेच विकार त्याच्या प्रभावाने नष्ट होत जातात. त्याच्या ज्या अंगाचे कीर्तन करावे, ते अंग आपलेच आहे असा आत्मीयतेचा भाव निर्माण होतो व चित्त शुद्ध होते. अहंकार चेतन म्हणजे शिव अवस्थेकडे गतिमान होणे होय. श्रवणामध्ये त्याची जी कीर्ती ऐकली तीच भावसंस्करण विधी होऊन कीर्तनरूपाने प्रगट होते. त्याच्या कीर्तनातच तो अहंकाररूपाने स्थित होतो.




Comments