top of page

जीवात्मा देह का सोडतो?

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

जेवढी धारणा तेवढेच धारण केल्या जाते. देहाच्या ठायी जीवात्म्याचे जेवढे शक्तित्व, उचलण्याचे व पेलण्याचे सामर्थ्य असेल, तेवढा काळ तो देह राहातो. पण जीवात्मा जर त्या देहाशी युक्त होताच, त्या देहास तेवढे धारकत्वाचे सामर्थ्य नसेल, तर तो देह त्या जीवास धारू शकत नाही. आणि मग तो जीवात्मा योग्य असा दुसरा देह घेण्यासाठी, हा जुना देह सोडून जातो. देह प्राप्त झाल्याबरोबरच त्याच्यामध्ये जे शक्तिघटक व तत्त्वाचे अणुसंघ, यात विस्कळीतता येऊ लागलेली असते. विस्कळीतता येण्यास त्या देहाच्या ठायी जो वेग आहे, तो कमी-अधिक असू शकतो. जोवर पूर्ण विस्कळीतपणा देहाच्या शक्तीच्या अणुसंघात नाही, तोवर तो जीव देह सोडीत नाही. पण पूर्ण विस्कळीतता आली म्हणजे मात्र त्या देहास तो टाकतो. ही विस्कळीतता कशी येते ? हे निसर्गतः घडते. प्राण व भूते यांचा संबंध साधणारे कर्मच या घटनेस कारण असते. आणि म्हणूनच नित्य सत्कर्मे करीत असावे, त्याने आयुष्य वाढते असे म्हणतात. आयुष्य वाढते याचा अर्थ देहाची विस्कळीत होण्याची गती मंदावते. काही सत्पुरुषांची ही गती स्थिरच झाली व ते चिरंजीव झाले. मारूती, अश्वत्थामा, परशुराम आदी. थोरांना नित्य देहावस्था आहे. भगवंताने आपल्या देहाचे वर्णन करताना 'जन्म कर्म च मे दिव्यम् ।' असेच म्हटले आहे. या सर्व विवेचनावरून हे लक्षात येते की, कर्माच्या सुसंवादित्वाप्रमाणे देह, प्राण व जीव यातही सुसंवादित्व नांदते व जेव्हा देह असंवादी होतो, तेव्हा हा जीव त्यास टाकतो व योग्य असा नवीन देह आपल्या कर्माप्रमाणे घेतो. अर्थात् हे संवादित्व कमी-अधिक करणे हे कर्माच्या आधीन आहे. पुढे देहाच्या प्राक्तनाप्रमाणे आयुर्मानही सांप्रतच्या कर्मावरच अवलंबून आहे.म्हणून देह सोडणे ही क्रिया जरी दिसत असली, तरी त्यात विनाशत्वाचा भाव नसून विस्कळीतता आहे. जीर्णत्व याचा अर्थ नाश असा करू नये. पण सर्वांनी तसाच बोध आपापल्या लिखाणात मांडला आहे. मला हे बरोबर वाटत नाही. आमचे म्हणणे असे आहे की, जीर्णत्व हे विस्कळीत होणे होय. ही विस्कळीतता त्या वस्तूच्या शक्तीवर, तसेच वापरणाऱ्याच्या कर्मावरच अवलंबून आहे. येथे वस्तू तर शक्तिसंपन्नच आहे पण कर्मच कदाचित् निःसत्त्व असू शकते. म्हणून देह व जीव यांचा संयोग किती काळ असावा हे कर्मानेच ठरवावे लागते. तो चिरंजीवही करता येईल.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page