top of page

व्यक्ती व समाजहित एकाचवेळी

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

सुखी होण्याच्या प्रेरणेने जरी मानव कर्मप्रवृत्त असला तरी त्याच्यापेक्षा बलवान सत्ताघटक जे समाज, राष्ट्र व विश्व हे जर स्वार्थपूरित व मर्यादित व्यक्तित्वाच्या सुखासीन कल्पनेचे असतील, तर ते आपल्या भ्रष्ट कर्माने, मानवाला सुखी व महान होण्यास अडथळा आणतात. याचा अर्थ असा की, समाजात रूढ असलेल्या कर्मप्रेरणा व कर्मगती जर सकळांच्या हिताच्या नसतील, राष्ट्राची नीती व कायदे जर सर्वांची प्रगती साधणारे नसतील व या साऱ्या कर्मप्रेरणा, कायदे, नीती यांना जर मोठे सामाजिक प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झालेले नसेल, तर निश्चितच व्यक्ती किंवा समाज उत्थान पावणे शक्य नाही. कारण रूढ असलेल्या कर्मविषयक भ्रष्ट विचारांनी मानवी निसर्ग व मानवी जीवनस्वातंत्र्य बंधनात पडेल. बलवान व प्रबळ सत्ताघटक मानवाच्या जीवनस्वातंत्र्यात वारंवार अडथळे निर्माण करतील. म्हणून वास्तविक व्यक्तीचे हित व समाजहित यात असा एक निसर्ग-दुवा आहे की, ज्यामुळे व्यक्तीच्या कल्याणाची पवित्र कर्मवाट हीच सर्व समाजाच्याही कल्याणाची वाट ठरते. पण आज मात्र याच्या अगदी उलट असे चित्र दिसते. कुठे समाजहिताच्या नावाखाली व्यक्तीच्या जीवनस्वातंत्र्याला मूठमाती मिळत आहे, तर कुठे व्यक्तिस्वातंत्र्याच्या भ्रामक विचाराने समाजस्वास्थ्यच धुळीला मिळविले जात आहे. समाजहिताची कल्पनाच काही ठिकाणी चमत्कारिक व व्यक्तित्वाचा नाश करणारी झाली आहे; तर काही ठिकाणी व्यक्ती व समाज यांचे नातेच बदलून, व्यक्तीच्या महानतेनेच समाजही महान होत असतो हे शास्त्रच धिःकारले जात आहे. आणि मग समाजाचे नियमन करणारे जे राज्यशासक असतील त्यांच्या तंत्राप्रमाणे व समाजशास्त्रविषयक त्यांच्या भ्रामक विचारांप्रमाणे जीवनस्वातंत्र्याच्या कल्पना एकतर बद्ध होत आहेत व काही ठिकाणी त्या स्वैरतेकडे चाललेल्या आहेत. आज भारतातील व भारताच्या बाहेर असलेल्या अन्य राष्ट्रसमूहातील मानवी जीवनाची वाटचाल पाहिली की हे अगदी स्पष्टपणे जाणवते. सर्व जागतिक परिस्थितीवरच याचा दुष्परिणाम झाला आहे व त्यामुळे बावळ्या लोकांचा दीन समाज, केवळ एकमेकांना खाण्यास टपलेल्या मार्जारवृत्तीचा झाला आहे. या सर्व परिस्थितीचे कारण एकच आहे व ते म्हणजे व्यक्ती व समाज यांच्या दरम्यान सुव्यवस्थित सूत्र ठेवणारे साधन जे 'कर्म' तेच विपरीतपणे व वेडगळ विचाराने जाणले जात आहे.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page