top of page

सात्विक आहार

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

सात्त्विक आहार सेवन करणे म्हणजे नेमका कोणता आहार घ्यावा किंवा कोणत्या व कशा आहाराला सात्त्विक म्हणावे हा साधकीय जीवनात मोठा विचार असतो. विशिष्ट पदार्थांना आपण सात्त्विक म्हणतो. पण सात्त्विक अवस्था पदार्थात असली म्हणजे तेवढ्याने केवळ आहार सात्त्विक ठरू शकतो का याचा विचार केला पाहिजे. केवळ व्हिटॅमिन्सयुक्त आहार म्हणजे सात्त्चिक आहार नव्हे. पदार्थस्थित सत्त्वमयता माणसाला सत्त्वशील करेलही. पण तेवढ्याने माणसाचे काम भागणार नाही. केवळ अशा आहाराने शरीरांतर्गत नाडीशुद्धी साधेल असे नाही. आहाराला सात्त्चिकतेचे मोजमाप लावण्याचे कर्म मोठे कठीण आहे. कारण त्याकरिता अत्यंत चौकस, निर्धारी व निश्चयी अशा पद्धतीचे जीवन जगावे लागते. म्हणून सर्वसाधारणपणे या आहाराची मीमांसा करताना शास्त्रांनी, वेदांनी अमुक खावे व अमुक खाऊ नये अशी पथ्यापथ्ये सांगितली आहेत. त्या पथ्या पथ्यांना 'विधी' आणि 'निषेध' अशा संज्ञा आहेत. निषेध समजून घेणे व विधियुक्त ग्रहण करणे, या दोन गोष्टींचा विवेक राखला म्हणजे सात्त्विक आहार घेता येतो. पण एवढ्याने कार्यभाग होत नाही. सत्त्वशुद्ध होणे हे साधकाला अतीव आवश्यक वाटत असते. म्हणून साधकाने आहार घेताना आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या सर्व क्रियांचे बारकाईने संशोधन केले पाहिजे.

आहार घेण्याच्या वेळी प्रथम शरीरामध्ये आतडी उत्तेजित होतात, नंतर ज्ञानवाहिन्या उत्तेजित होतात व नंतर स्वाद संयोग निर्माण करणाऱ्या ग्रंथी उत्तेजित होतात. या सर्व ग्रंथी, सर्व ज्ञानवाहिन्या, सर्व आतडी उत्तेजित झाल्याशिवाय अन्न ग्रहण करण्याची इच्छाच उत्पन्न होत नाही. ज्यावेळी एखाद्या माणसाला अतीव भूक लागते, त्यावेळी त्याची आतडी प्रक्षोभ पावलेली असतात. आतडी प्रक्षोभ पावली की ज्ञानवाहिन्या विकृत होतात व तीव्र रस उत्तेजित होतात. म्हणून अतीव भूक लागलेल्या माणसाला अशा वेळी तामस पदार्थ ग्रहण करण्याची इच्छा उत्पन्न होते. या क्रियेकडे जरा बारकाईने पाहिले असता असे लक्षात येईल की आतडी, ज्ञानवाहिन्या व स्वादस्फोटक ग्रंथी या तिन्हींचे उत्तेजन क्रमबद्ध झाले पाहिजे. या क्रमबद्ध उत्तेजनासाठी शास्त्राने तीन गोष्टी सांगितल्या आहेत. १) आतड्यांचा व्यायाम म्हणजे आसने. २) ज्ञानवाहिन्यांचा व्यायाम म्हणजे प्राणायाम व ३) स्वादुपिंडाचा व्यायाम म्हणजे मुद्रा होत. या तीन प्रकारच्या व्यायामांचे अवलंबन जेव्हा आपण दैनंदिन जीवनात करू, तेव्हा मग आहारात कोणता पदार्थ येतो याला विशेष महत्त्व न राहून, कोणताही पदार्थ सेवन केला तरी त्यातून सत्त्व मिळू लागते. पण आतडी, ज्ञानवाहिन्या व स्वादस्फोटक ग्रंथी यांचे क्रमबद्ध उत्तेजन न घडता, केवळ सात्त्विक पदार्थ ग्रहण केले तर अपचनादी दोषच निर्माण होतात. नर्व्ह सिस्टिम बिघडते. ब्लडप्रेशरचा विकार जडतो व शरीरात अनेक विकृती निर्माण होतात. म्हणून सात्त्विक आहाराचा विवेक एवढाच की, आतड्यांचे उत्तेजन, ज्ञानवाहिन्यांचे उत्तेजन व स्वादग्रंथींचे उत्तेजन हे क्रमबद्ध व प्रमाणशीर असले पाहिजे. ही प्रमाणबद्धता समजून येणे कठीण आहे. म्हणून त्यांना आसने, प्राणायाम व मुद्रा यांचा प्रमाणबद्ध व्यायाम दिला पाहिजे. या तिन्ही व्यायामांचे अनेक प्रकार आहेत, तो मोठ्या विस्ताराचा विषय आहे. पण साधकाने तो समजून घेणे अगत्याचे आहे. प्राणायामाचे एकूण ११६ प्रकार आहेत. पण त्यातील आठ प्रकारचे प्राणायाम अभ्यासिले तरी ते उपयुक्त आहे. या आठ प्रकारच्या प्राणायामांनी ज्ञानतंतूचा सुरळीतपणा राखला जातो. जगात वागत असताना आपल्या ज्ञानतंतूवर होणारे आघात दूर सारणे हे मोठे कठीण काम असते. म्हणून निरामय एकांताची गरज साधकाला असते. ज्ञानतंतूवर आघात झाले की अपचनाला सुरवात होते. ज्ञानतंतूवरील आघाताला आपण 'मानसिक व्यथा' म्हणून संबोधतो. पण या आघाताने अपचनासारखा रोग निश्चित निर्माण होतो. मन ज्या दिवशी प्रसन्न असेल त्या दिवशी शौचासही साफ होते व वैचारिक गुंतागुंत, मनाची अप्रसन्नता निर्माण झाली की शौचास साफ होत नाही व भूकही लागेनाशी होते. जठराग्नी मंदावतो. अशावेळी साधना घडणे असंभव असते. म्हणून साधनेमध्ये 'संयमित विहार' व 'परिमित आहार' आवश्यक आहे. शरीरस्वास्थ्यासाठी हा एक महत्तम विचार आहे.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page