गुरुआज्ञा!
- shashwatsangati
- May 7
- 1 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

भगवंताचे भक्तभेटीसाठी धावणे हे भक्ताच्या भावाकिरणातूनच घडणार ! भक्तभावाचा सोहळा आकाशव्यापी झाल्यावर भगवंत कुठे जाणार ! जनाबाईच्या शब्दात सांगायचे झाल्यास,
"हृदय बंदीखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ।।"
भगवंत प्रथम 'चित्त चैतन्य चोरुनी नेले वो' असे भक्तजीवन करतो आणि पुढे भक्ताघरी राबतो ! व्याकूळ मनाने भगवंताचे कूळ व भावाचे मूळ घट्टच होणार .
गुरुसेवा हे सर्व धर्मांत श्रेष्ठ व्रत आहे. तथापि गुरुसेवा म्हणजे काय हे आपण न ठरविता, गुर्वाज्ञेत वर्तणे व गुरुप्रेमाने तसे वागणे हे सेवेचे लक्षण आहे. कर्तव्यकर्म हा बाजारु मनाचा बावळट व भोगरूप विचार आहे. कर्तव्य हे मूलधर्म पालनार्थच असते. प्रमुख धर्म सोडून जे कर्तव्य ते कर्तव्य नसून स्वार्थी व भोगलंपट मनाचा घमेंडखोर प्रलाप आहे. देवाचा धर्म सांभाळण्याकरिताच सकल धर्मांचे निर्माण आहे. कर्तव्यकर्माचा विचार भोगरूप करणे म्हणजे कर्म अधर्मरुप करणे होय. म्हणूनच बऱ्याच मोठ्या पण स्वार्थी लोकांची ह्या अधर्माला धर्म म्हणून प्रतिष्ठेने मिरविण्याची इच्छा असते. पण संत समाजात त्यांच्या या मूर्ख विचाराला काहीच स्थान नाही.
गुरु हे सर्वज्ञ व आपल्या शिष्याचे कल्याण पाहणारे दैवत आहे. शिष्य जीवनाचा सर्व भार तेच उचलतात. योग्य वेळी योग्य कर्म कोणते याचे ज्ञान ह्या कर्तव्यवादी अधार्मिकांना नसते. म्हणून गुर्वाज्ञाच प्रमाण हे ज्याचे जीवन तो आदी व अंती सुखी होतो. महानतेचा वारसा त्याला लाभतो. अभिमानाने आंधळे झालेल्या लोकांना हे उमगणे कठीण आहे. म्हणूनच कर्तव्यकर्म करताना त्यांना खरेखुरे सुख व समाधान लाभत नाही. मग प्रपंच हा वाईटच आहे अशी पोकळ बडबड ते करीत राहतात. गुरुसेवा याचा विवेक गुरूंच्या आज्ञेने वर्तणे असा आहे. ह्यात शिष्याच्या मनाप्रमाणे घडेल असे नाही. तेव्हां त्या शिष्याने कष्टी न होता गुरुप्रेमाने आज्ञापालनात सर्व भाव केंद्रित करून जगायचे असते. म्हणजे गुरुकृपेचा सोहळा ज्ञानेश्वरांच्या मते स्वाभाविकच घडतो. खूप विचार करीत न बसता प्रेमाच्या निवांत जागी जा म्हणजे तिथे आपली भेट सहज आहे.




Comments