चिंतन याचा अर्थ काय?
- shashwatsangati
- Jun 18
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

मन आणि बुद्धी समत्वाने परमात्मप्रेमात सातत्याने रत करण्याच्या व्यथेला चिंतन ही स्थिति आहे. जे मनात उगवावं ते बुद्धीने पाहावं. जे बुद्धीत कळावं ते मनाने आचरावं. अशी वास्तविकतः सामरस्याची, मन आणि बुद्धीची जर व्यवस्था झाली तर चिंतनाला स्थिती आहे असं समजा. नाही तर बुद्धी हरीचं चिंतन करतेय आणि मन मात्र विषयरत आहे तर ते चिंतन नव्हे. मन आणि बुद्धी ही एकरसाने जेव्हा आम्ही भरू लागू त्या वेळेला चिंतन होऊ लागलेलं आहे . मीराबाई एक राजकुमारी, एका थोरल्या राजाची ती पत्नी, एका राजाची कन्या. त्या वेळच्या काळामध्ये राजघराण्यातले रीतिरिवाज; परंतु हरिप्रेमाची चटक निर्माण झाली. हृदयात हरी शिरला आणि परमेश्वराने हृदय आकृष्ट केलं. मन मनाच्या पासून वेगळं झालं. तिला हे कळेना आता मी काय आचरावं, काय करावं, कोणत्या स्वरूपाकडे मी धावावं आणि त्याच वेळेला अत्यंत आतूर झालेल्या आर्त भावाने ती आक्रंदन करू लागली, परमेश्वराचं चिंतन करू लागली. प्रभूच्या एकंदर प्राप्तव्यार्थ, प्रभुदर्शनार्थ व्याकूळ झालेल्या चित्ताचं चिंतन खऱ्याखुऱ्या मनाचं होऊ लागलं. विषयाच्या प्राप्तव्यामध्ये व्याकूळ झालेला माणूस जसा विषयाचं चिंतन खऱ्या अर्थाने करतो, भोगाची भावना जरी असली, तरी भोगव्यथा तिथे नसते तर विरहव्यथा जागी करून विषयाचं चिंतन जसं त्याने साधावं त्याच पद्धतीने परमेश्वराच्या प्रीतिसंकल्पामध्ये या मीराबाईचं हृदय स्थित झालं आणि तिला असा पेच निर्माण झाला की हा लौकिक सांडू की श्रीहरी साठवू ? शेवटी तुलसीदासांनी तिला आव्हान दिलं की ईश्वराच्या प्राप्तीप्रीत्यर्थ संपूर्ण मन-बुद्धीत स्थित झालेला जो काही कीर्तीचा विशाल प्रदेश असेल, जो काही धनाढ्यतेचा सुखाचा प्रांत असेल, तो सर्व सांड आणि एकंदर मन आणि बुद्धीचं देऊन टाक. म्हणजे तू कोण आहेस? तू कोणीच नाही तुझं अस्तित्व शून्य झालं.
मग शून्य अस्तित्वाच्या माणसाला या जगात स्थान ते काय? ज्याची मन आणि बुद्धी परमेश्वरात लीन झाली त्याचा संपूर्ण कारभार ईश्वरच पाहू लागतो. मग परमेश्वराच्या जगाचा तो अधिकारी झाला. परमेश्वराच्या जगात वावरणारा तो अधिपती झाला आणि मग मात्र त्याला दुःखाचा कुठलाही प्रांत नाही. मग त्याची ऊर्ध्वगतिक दशा हीही खुंटली आणि अधोगतीही खुंटली. या दोन्ही दशेविरहीत स्थिती घेण्याची कला मन आणि बुद्धीमुळे परिवर्तन आहे. विश्वातल्या स्पंदनांमध्ये मनाचा आणि बुद्धीचाच प्रकार खेळतोय. आमच्याच बुद्धीने आणि मनाने सारं विश्व बदलविण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. पण मन आणि बुद्धी ही जर ईश्वरप्रेमात आली तर सारे विश्व ईश्वर रूपाला येऊ लागते.




Comments