चिदानंद
- shashwatsangati
- May 28
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
आनंद : -
मीत्वाची सर्वत्र जाणीव
प्रियत्वाचा विलास
विश्वस्थाचा उदय व लय प्रेमातच झाल्याची स्वसंवेद्य स्मृति
आत्मगत प्रसिद्धीच्या विलासामुळे निर्माण झालेली वृत्ती
स्वगत सत् चिदानंदाची अनुपमेय अनुभूति.
विवरण :- व्यक्तिनिष्ठ अहंकृत चैतन्य जेव्हा आपल्याच ठिकाणी काही सामर्थ्याची उणीव समजते वा ते चैतन्य उणेपणाने जीवन कलहात सिद्ध होते, तेव्हा आनंदाच्या संवेदनेचे निराळेच केंद्र होते. अनंत केंद्रांचा विचार हा देहतादात्म्य. हा गेल्याशिवाय आनंदाचे स्वाभाविकपण शक्य नाही. विश्वातील आनंदाचे दिसणारे स्वरूप हे क्षणैक का ? तर तो आनंद मूलकेंद्रातून (अव्यक्त) स्फूर्त झाला नसून पदार्थ सापेक्षतेत स्फूर्त झालेला असतो. आपले उणेपण झाकून वा भरून काढण्याचे प्रवृत्तीत जीव येतो व जी उणीव त्याच्या प्रतीतीला आली, तिच्या सजातीय धर्माचे विश्वस्थ पदार्थात दर्शन होताच त्या पदार्थाचे ग्रहण वा भोग घेण्याचे तो करतो. तथापि इथे लक्षात घेतले पाहिजे की त्याला पदार्थाच्या माध्यमाची गरज नाही. पण आपल्या चित्तधारणेची उणीव पूर्ण करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून पदार्थाचा प्राणमय कोष व आपला प्राणमय कोष यांचे तादात्म्य घेऊन तो आनंदकोषात प्रविष्ट होतो. म्हणजे इथे जी आनंदाची प्रतीती आहे, ती चैतन्याचे अपूर्णत्व पूर्णत्वात आल्याच्या जाणीवेने आहे. प्रत्येक जीव याचा अनुभव करतो. पण पदार्थस्थित आकाराचे इंद्रियज्ञान हेच अज्ञान असल्यामुळे हा आनंद पदार्थापासून मिळाला असे समजतो व त्यातील अज्ञानातून ज्ञानाकडे असलेला प्रवास तो विसरतो. वास्तविक दोन विशिष्ट चैतन्याच्या सधर्मक अवस्था एक होताच हे चैतन्यस्फुरण जागे होते व त्याच्या जागेपणात आनंद वाटतो. हा, चैतन्याच्या उणिवेचा पूर्णता करण्याचा हव्यास, चैतन्यवृत्तीच्या विस्मृतकाली होतो. पण सद्गुरुंना हेच सूक्ष्मपण निखळ स्पष्ट असल्यामुळे, त्या व्यष्टिचैतन्याचा आविष्कार ज्या व्यष्टिअहंकारामुळे मर्यादित झाला त्या अहंकाराचेच त्यांनी निरहंकार भावनेत विसर्जन केलेले असते, ज्यामुळे अहंकाराचे द्वार शिव झाले व या शिवाहंकारातून चैतन्य प्रस्फुरित झाले म्हणजे आनंदाचाच उगम होतो. म्हणून प्रगटपणहि आनंदाचे व अप्रगटपणहि आनंदाचेच ठरते. (आनंदाचे डोही)
सद्गुरु हे विश्वपरिसरात आपल्या शिवचैतन्याने विहरतात. हा शिवचिदाहंकार म्हणजे विश्वधारणा वा समष्टिधारणा होय. ज्यात मीच सर्व आहे या बोधाचे संवेद्य सुख ते अनुभवतात.




Comments