देह निर्मिती आणि पुनर्जन्म यांचे नाते
- shashwatsangati
- Sep 24
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
स्थूल देह गेल्यानंतर जीवात्मा हा लिंग देह घेतो. या सर्व वेगवेगळ्या देहांची मूलतत्त्वेही भिन्न आहेत. स्थूल देहाचा तत्त्व-संबंध या लिंगदेहाशी असतो, पण पृथ्वी व आप ही तत्त्वे त्यात राहात नाहीत. बाकी मग या स्थूलाची सर्व तत्त्वे यात येतात. त्यामुळे त्या लिंगदेही पुरुषास स्थूल जग कळते पण स्थूलपणे विहरता येत नाही. तो त्या सूक्ष्म देहाने विहरत असतो. पुढे या लिंगदेहात जो अहंकार आहे, तो महादाकाशात भ्रमण करतो. पुढे त्याच्या गुणकर्माप्रमाणे, तो अहंकार आपल्या श्रेष्ठतेप्रमाणे किंवा योग्यतेप्रमाणे या पंचमहाभूतांना व्यापतो.
जसे आपल्याजवळ दहा रुपये असले आणि दुकानात हजारो रुपयांचा माल असला, तरी आपण तेवढाच माल त्यातून खरेदी करू शकतो की जेवढे मूल्य आपल्याजवळ आहे. म्हणजे दहा रुपयांचाच माल आपल्याला घेता येईल. त्याप्रमाणेच जीवाचे जेवढे शुद्ध, व्यापक व सत्कर्म असेल तेवढे शुद्ध, व्यापक व तेवढा काळ या पंचमहाभूतांना तो स्वाधीन करतो. हे सर्व सहज घडत असते. गंगेत जर वेगवेगळ्या मापाचे, आकारमानाचे शेकडो घट ठेवले, तर ते तेवढेच भरतील की जेवढे त्यांचे आकारमान आहे. आता येथे जसे ना घट कोणी भरीत, ना कोणी भरावे म्हणत, तर ते वाहात्या योगात सन्मुख होताच निसर्गानेच भरतात. तद्वत् अनंत मृतजीव आपापल्या अधिकाराप्रमाणे या पंचमहाभूतांना आपल्यासाठी साठवितात. मग पुढे त्या पाच तत्त्वांची वीण इच्छेप्रमाणे घडते. ही इच्छाही मरणकाळी जशी असेल तसे जाणावे. म्हणजे प्रथम शुद्धाशुद्ध अहंकाराने सामान गोळा केले, पुढे त्याचा उपयोग इच्छेने केला व मग कर्मगतीने त्या सर्व कृती, त्या योनीला प्राप्त झाल्या. म्हणूनच अशाप्रकारे देहनिर्मिती झाल्याबरोबर त्या पंचमहाभूतांच्या मिश्रणाप्रमाणे व इच्छेने घडविलेल्या आकारात, तो जीव आपल्या लिंगशरीरासह शिरतो. याचा अर्थ कदाचित् आकार जर पशूचा आला, तर तो जीवात्मा त्या आकाराने पुढचा जन्म म्हणून या स्थूल जगात येतो. जेवढे साहित्य असेल तेवढा व तसाच आकार निर्माण होतो. अहंकार जर जड (पृथ्वीतत्त्वाचा), विशेष (जलतत्त्व), प्रकृतिरूप तृष्णा (वायुरूप), अस्थिर पण भोगासक्त (तेजतत्त्व), पुरुषार्थ वा सामर्थ्यपूरक (आकाशतत्त्व), निर्विकार व शुद्ध असेल त्याप्रमाणे तो ती तत्त्वे घेऊ शकतो. त्या तत्त्वांच्या मिश्रणात जो आकार
शक्य असेल, तिकडे तो जीवात्मा वळतो.
या सर्व विवरणातून हे लक्षात येते की शुद्ध देह, सुंदर व अत्यंत पावन पुरुषार्थी जन्म लाभावा असे वाटत असेल, तर अहंकार शुद्ध व व्यापक केला पाहिजे. तसेच सुख व आनंद लाभावा असे वाटत असेल, तर मरणसमयी आनंदरूप प्रभूचे स्मरण केले पाहिजे वा निर्विकार अवस्था साधली पाहिजे. एकूण पुढील जन्म व देह कसा लाभावा हे आपल्याच स्वाधीन आहे. आणि हा देह केवळ आत्मतत्त्वाच्या समीप अहंतेप्रमाणे बरा-वाईट योनीचा लाभतो असे आपणास कळून येते.




Comments