निर्वासना
- shashwatsangati
- Jul 9
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
अखंड दक्षता कशी साधावी ? तर ही दक्षता सांभाळण्यासाठी निर्वासन झालं पाहिजे. पण हे लक्षात ठेवा की वासनात्याग म्हणजे निर्वासन होणे नव्हे. वासना थोपविणे म्हणजे निर्वासन नव्हे. इच्छा मारणे म्हणजेही निर्वासन नव्हे. निर्वासन होणे याचा अर्थ फक्त एवढाच की, तुला जे जे हवे आहे, ते ते नको म्हण. जी जी इच्छा निर्माण होईल ती ती आपल्याला नको या शब्दांनी गाडून टाक. तुम्ही जे जे काही करता ते ते काहीतरी हवे आहे म्हणून करता ना ? आता तुम्ही जे जे काही कराल, ते ते नको म्हणून करा म्हणजे निर्वासन असा अर्थ झाला. नको म्हणून करावयाचे म्हटले तर कर्माची प्रेरणाच व्हावयाची नाही असे कदाचित् तुम्हांस वाटेल. काहीतरी हवे आहे ही तर कर्माची प्रेरणा आहे असे तुम्ही म्हणाल. पण हे साफ खोटे आहे. 'हवे' ही कर्माची प्रेरणा आहे हे म्हणणे अगदीच खोटे आहे. काहीतरी करणे ही प्रकृतीची प्रेरणा आहे. तुमची नव्हे ! काहीतरी करणे ही प्रकृतीची प्रेरणा आहे व काय करावे ही तुमची प्रेरणा आहे. करीत राहणे हा प्रकृतीचा प्रेरक धर्म आहे. विराट पुरुषाच्या निजानंदाचा तो स्वभाव आहे. काहीतरी करीत राहणे, चालत राहणे, हा प्रकृतीचा प्रेरक धर्म आहे. वेदांत त्याचे एक मोठे प्रकरणच आहे. "चरैवेति- चरैवेति...!" असे वेदांचे सांघिक गीत आहे. चालत राहा ! म्हणजे मुक्कामाला पोहोचाल. फक्त चालत राहा ! पण कुणीकडे असा प्रश्न विचारला म्हणजे मग ते तुमचे गांव नव्हे. जिकडे जायचे आहे ते गांव येणार नाही. कुठेतरी क्रॉसिंग येईल आणि मग तुम्हांस पेच पडेल की, कोणता रस्ता धरला म्हणजे तो आपल्या गांवाला जाईल. याचेच नांव इच्छा. इथेच इच्छा फुटते. करणे या प्रेरणेचे नांव इच्छा नसून, काय करणे याचे नांव इच्छा आहे. काय करावे असे जेव्हा तुम्हांला वाटेल तेव्हा समजा की तेथे इच्छा आली. म्हणून कोणती कृती करावी हे तुम्ही ठरवू नका. ते त्याने (ईश्वराने) ठरविले आहे. म्हणजे सहज कर्म करा. या सहजकर्मालाच स्वभावकर्म किंवा स्वधर्मकर्म म्हटलेले आहे. हा मोठा सखोल विचार आहे. तो नीट समजून घेतला पाहिजे. निर्वासन होण्याकरिता याची आवश्यकता आहे. सहजकर्म करा यातील 'करा' चा अर्थ 'स्वीकारा' एवढाच आहे. सहजकर्म स्वीकारा म्हणजे तुम्ही निर्वासन व्हाल.




Comments