भारतीय परंपरा
- shashwatsangati
- Oct 1
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
धार्मिक म्हणविणाऱ्यांचा समाजातील आजचा विहार व धर्माविषयीच्या प्रचलित समजुती, या गोष्टी तरुण मनाला धर्म समजून घेण्याची इच्छा निर्माण करीत नाहीत. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्यांच्या जीवनात जिथे दिव्यता संभवलेली दिसत नाही तिथे तशा धार्मिकांबद्दल व धर्माबद्दल तरुण पिढीच्या मनात धर्मप्रेम कसे निर्माण व्हावे? धर्मामृतापासून वंचित होण्याचे हे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे धार्मिकाला व धार्मिकतेला समाजात आज मानाचे, प्रतिष्ठेचे पान मिळत नाही. धार्मिक आज चेष्टेचा विषय झाला आहे. समाजात आपल्याला प्रतिष्ठेने, सन्मानाने जगता यावे, आपण जोपासलेले सद् विचार, सत् निष्ठा, सद्भावना समाज जीवनातही साकार झालेल्या पहाव्या ही ओढ माणसात सहज स्वाभाविक असते. पण सदाचार, नीतिमत्ता या धर्माच्या मानदंडाला आज आव्हान मिळालेले आहे. समाजातील अनैतिक विहार हाच प्रतिष्ठा पावत चालला आहे. प्रतिष्ठा, सन्मान आदि शब्दांचा अर्थ आज गढूळलेला आहे. असे असले तरी सन्मानीत जीवन जगण्याची ही आत्म्याचीच प्रेरणा आहे (असते). आत्मसन्मान म्हणजे आत्म्याचाच सन्मान म्हणजे देवत्वाचा सन्मान. पण आज आत्मसन्मान म्हणजे देहबुद्धीने स्विकारलेल्या अहंकाराचा सन्मान म्हणजे स्वाभिमान किंवा आत्मसन्मान समजतात. पण या दूषित अहंकाराऐवजी देवत्वाचा सन्मान जगात नांदावा अशी इच्छा आहे. तेव्हा त्याकरता धार्मिक जगतातल्या रुढीप्रिय गोष्टी ज्या परंपरेने अनंतकाळ चालू आहेत, ज्यात अंधता आहे, गुलामी आहे, ज्या शास्त्रशुद्ध नसल्याने माणसातील तेज आणि पौरुष जागृत करु शकत नाहीत. अशा गोष्टी जनमानसातून काढून टाकावयास हव्या. दूर करावयास हव्यात.
पण परंपरा खऱ्या अर्थाने सत्याची असते, शाश्वताची असते, ज्ञानाची असते. ती कोणत्याही काळी मानवाला धीर, सामर्थ्य, तेज प्राप्त करुन देणारी असते. ती कधीच टाकाऊ, जुनी होऊ शकत नाही. ती नित्य नूतनच असते. परंपरेविषयीचा अभिमान म्हणजे भोंगळपणा नव्हे किंवा आंधळेपणा नव्हे. खरोखरच परंपरा समृद्ध करुन सतेज राखावयाची असेल तर तिने दिलेली प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासून अनुभवगम्य केली पाहिजे.
भारताची परंपरा ही ज्ञानाची परंपरा आहे. ही सत्यासमीप नेणारी आहे. सत्याची अनुभूती देणारी आहे. हा नुसता बौद्धिक विलास नाही. ही अभ्यासकाला, उपासकाला अनुभवगम्य अशी आहे. जीवन सबल, सतेज करणारी आहे.




Comments