top of page

वृत्ती अभ्यास

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

ree

आपण व जग या दोन गोष्टी म्हणजे काय हे निश्चयाने समजून घेतले पाहिजे. विश्वाचे सर्व दृश्य हे केवळ बुद्धीच्या जाणिवेच्या आकृतीने दर्शन होय. पदार्थ ही स्थिती आपल्या, म्हणजे मानवाच्या बुद्धिस्पर्शाशिवाय उदयच होत नसते. किंबहुना द्रव्यता व मीत्वाचे स्फुरण यांची युती घडून एक वृत्ती तयार होते. ह्या वृत्तीचा अर्थ आहे, द्रव्यतेत बद्ध झालेल्या 'मी' चे दर्शन. पण याच 'मी' चे दर्शनास द्रव्यतेचा आकार व विकार संभवतो. 'मी' ने द्रव्यतेच्या आकाराचे स्वला कल्पिणे म्हणजेच विकार होय. या विकाराची जी संवेदना तोच 'मी' चा आकार असतो. असे अखंड चालू असते. 'मी' ही स्वगत स्फुरणा द्रव्यतेशी युती पावते, द्रव्यतेत बद्ध होते, द्रव्यतेच्या आकाराएवढाच 'मी' स्वला कल्पितो व पुढे या सर्व घटनांचा चित्तवृत्ती म्हणून एक प्रकार होतो. पाण्याच्या प्रवाहात अनंत भांडी ठेवावी. पाणी ते भांडे भरते, भांडे भरले की पाणी पुढे पुन्हा वाहू लागते. अनेक भांड्यातील पाणी ह्या वृत्ती होत व या सर्व भांड्यांतून तसेच स्वतंत्र प्रवाहरूपाने असणारे गतिमान पाणी ही आपली मूळ चित्-स्फुरणा होय. पण प्रत्येक भांड्याच्या आकारात भरलेले पाणी आकारी होते व त्याचमुळे तो आकार हा पूर्ण प्रवाहाचा विच्छेद करणारा विकार ठरतो. आपण व विश्व यात असेच आहे.


आपली मूळ स्फुरणा प्रवाहरूप म्हणजे अखंड आहे. ते 'मी' चे शुद्ध भान होय. पण दरवेळी संवेदनेच्या मापात 'मी' शिरतो. तेवढा बनतो व अशा अनेक 'मी' चे प्रस्फुरण संवेदनारूपाने आपल्यात स्थानापन्न होते. एवढेच नव्हे तर या 'मी' ला संवेदनेचा आकार घडल्यामुळे तो स्वतःच संवेदनेचे एक पात्र अर्थात् पदार्थ या स्थितीने आपण पाहू लागतो. या अवस्थेतच 'स्मृती' हा घटक उद्भवतो. या स्मृतीतच विश्व घटना घडत असते. पण यथार्थाने ह्या सर्व स्मृती वा वृत्ती म्हणजे केवळ 'मी' ला संवेदनेच्या कक्षेत पात्रात बद्ध झालेल्या आपल्या रूपाचे दर्शन असेच म्हणता येते. नव्हे पदार्थ ही वस्तूच नसते तर संवेदनेच्या आकारात प्रगटणारे 'मी' पण म्हणजे पदार्थ असेच स्पष्ट होते. हे समजले म्हणजे संवेदनेतून 'मी' ला उणे करावे. मग निःसंवेद्य धर्मच आढळतो. पदार्थ हे शून्यमय होतात. यालाच 'वृत्ती' अभ्यास म्हणायचे.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page