शाश्वत अशाश्वत भेद
- shashwatsangati
- Jun 11
- 1 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

जग आपण पाहतो व ते आपणास विनाशी का दिसते हे कोडे सोडवा. दिसते ते नासते तर शरीर नष्ट होणारच ना? सोन्याचा आकार सोन्याविरहित कसा असणार? सूर्याचा आकार व प्रकाश हे वेगळे आहेत का? धर्म हा धर्मियाला व्यापून आहे. खडीसाखरेचा खडा हा गोडीचा आकार, दोन्ही अभिन्न. तसे शरीर हा चैतन्याचा आकार तर तो नष्ट नाही. तर त्यात अव्यक्तच व्यक्त होते. सगुणाची व्याप्ती ही परमात्मव्याप्तीच. तुळशी मणी ही तुळसच. आकारातून येणारी संवेदना महत्वाची. केवळ आकाराला ज्ञान म्हणणे याला अर्थ नाही. आपली बुद्धी या चैतन्य बोधावर आरूढ करणे हाच जीवनधर्म. विश्वाकार बदललेला वाटला तरी विश्वस्थ बदलत नाही. बाल, तरूण व वृद्ध यातून व्यवस्था 'मी'चीच. देवपणा (अव्यक्त) झाकून देव मोठा (सगुण) झाला. बालकाचे बालपण झाकून तो तरूण झाला. ईश्वराचाच विश्वभान झाला. बालपण उद्या मिळणार नाही पण तारूण्यात जो बाळ होता तो मिळालाच.
अज्ञान व ज्ञान यातून विहरणारा ईश्वरच. स्वप्न जागृतीचा पुरूष बदलत नाही. अवस्थाभेदाने स्मरणसुख सुरूच आहे. विश्वाकार ईश्वर ही लीला. जागृत व स्वप्न या अवस्थेसारखे सुखदभान दोन्हीतूनही मिळणारच. त्यात प्रेमपूर्ण स्फुरणा कधी विश्व, कधी विश्वाहून वेगळा. जीव व शरीर वेगळे पण अमान्य. शरीरासहित तूच (चैतन्य) आहेस. शरीर का बदलते तर इच्छा. वासांसि जिर्णानि यथाविहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि यात नाविन्य काय? ज्याचा जुनेपणा तोच नाविन्यात आला. आपली व्यवस्था एकच पण ज्ञान दररोज बदलते. विश्व एकच पण आपले विश्वविषयक ज्ञान फरक पावते त्याला अज्ञान कल्प म्हणतात. ही दृष्टी (साम्यभावना) साम्यभाव देऊन संतांनी सामरस्यात 'विश्वोऽहं' चा स्पंद दिला. ज्ञानावस्था हीच व यातच शाश्वत व अशाश्वत हा भेद मिटला.




Comments