top of page

संतांचे लक्ष्य: निजानंद सहजावस्था

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

ree

समजा एखाद्याला मृत्यू आला, म्हणजे स्थूल घटना काय झाली? तर त्याच्या आताचे नामरूपात्मक अस्तित्व शून्य झाले. पण माणसास अज्ञात असलेली सृष्टी-रचनेची रीत याचवेळी सुरू होते. ती अशी की देह गेला म्हणजे स्थूल आकार निर्जीव झाला. त्यात जाणीव उरली नाही. तो आता सर्वच व्यवहार सोडून आहे. म्हणजे ज्याचा कुणाचा तो देह होता, तो त्या देहास टाकून गेला. पण गेला कुठे? त्याचे असे आहे की या देहातच आणखी तीन देह असतात. जसा हा दिसणारा देह म्हणजे १) स्थूलदेह, तसेच त्याच्या आत २) लिंगदेह (सूक्ष्मदेह) ३) कारण व ४) महाकारण अशा चार नांवांनी जाणले जाणारे हे चार देह आहेत. या चारही देहांचा संबंध प्राणाने जोडलेला असतो. या चारही देहांच्या चार वाणी म्हणजे १) वैखरी २) मध्यमा ३) पश्यन्ति ४) परा अशा आहेत. तसेच चार अवस्था आहेत. १) जागृती, २) स्वप्न, ३) सुषुप्ती, ४) तूर्या या चार अवस्था आहेत. या चार अवस्थांत आपण प्रसंगाप्रसंगाने नांदत असतो. पण जेव्हा ज्या अवस्थेत असू तेव्हा तोच देह आपण आपला आहे असे समजत असतो. जागृतीत असलो म्हणजे हाच देह (स्थूल) आपला असे जाणतो. स्वप्नात गेलो की तेच आपले (सूक्ष्म) असे जाणतो. मग त्यावेळी या सृष्टीचे दुसरे काहीच आपण जाणत नाही. सर्वसाधारणपणे या दोनच अवस्थात माणसे असतात. पण स्वप्नात एकदा जागृती म्हणजे सावधपणा आला की, सुषुप्ती म्हणजे तेथील कारणदेहाचे स्थान आपल्यास कळते. आता या स्वप्नात कसे सावध असावे यासाठी स्वतंत्र उपासना आहे. आता याहीपुढे गुरुकृपा वा प्रभुकृपा यांच्या साहाय्याने जीव तूर्येकडे जातो व तेथे त्याला महाकारण-देह कळतो. या सर्व देहांत, कारण देहापासून स्थूलदेहापर्यंत अज्ञान- प्रदेश आहे. म्हणूनच तो सर्व प्रदेश उत्तरोत्तर सुखाचा असला तरी या कारणदेहापासूनही बरेच अनुभवी व सिद्ध पुन्हा या भ्रांतीपावेतो येतात. याच कारणदेहाचा भेद करून जेव्हा जीव तूर्येकडे वळतो, तेव्हा गुरुंच्या प्रकाशमय वलयात मात्र त्याचे पतन संभवत नाही. ही महाकारण अवस्था म्हणजे पिंडाची शुद्धावस्था होय. ब्रह्मांडात यालाच 'अव्याकृत' किंवा 'हिरण्यगर्भ देह' असे म्हणतात. आता खरीखुरी अवस्था म्हणजे या ज्ञानापुढेही जीव जेव्हा देहस्थितींतून सुटून आत्म्यातच मिसळतो तेव्हा ‘उन्मनी' अवस्था येते. येथे मात्र हे चारही देह एकरस, एकरूप, एकगुण असे होतात व अवस्थाभेद उरत नाही. तो जीव सर्व देहांत समाधीनेच विहरतो. याहीपुढे 'निजानंद सहजावस्था' आहे. ही सहजावस्था हेच संतांचे लक्ष्य असते. तोपर्यंत जीवाला गेले पाहिजे असे संत जाणतात. यापुढे मात्र तो जीव जीवरूपाने आत्म्याचे सर्वव्यापकत्व, स्वानंदरूप व ज्ञानरूप पूर्णांशाने अनुभवीत असतो. तत्पूर्वी या मूळ आत्मरूपाचा म्हणजे आपल्या स्वरूपाचा जो बोध तो अल्पतेने होतो. म्हणूनच ते अज्ञान म्हटले आहे. स्थूलदेहात तर हे अज्ञान पूर्णच होते. तथापि अति अल्प असे आत्मज्ञानस्पंद त्यातही असतातच. म्हणूनच तो जीव आपण असावे, महान् व्हावे, मरू नये आदी संकल्प करीत असतो. कारण असे वाटणे हे आत्म्याच्या स्वभाव-लक्षणाचा प्रभावच होय. तो आत्मा स्वतः आनंदरूप, दिव्य व सर्वव्यापक आहे. म्हणूनच या इच्छा मानवाच्या ठायी होतात. नाहीतर त्याचा निसर्ग मृतच आहे.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page