सगुणोपासना
- shashwatsangati
- May 21
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
सगुणोपासना ही साधक उत्थानाचा, साधक अनुभवाचा एक प्रवाहच असते. प्रतीकोपासन, प्रतिरुप, भावरुप व निदानोपासन अशा चार अवस्थांतून उपासनेचा प्रवाह असतो. हे चार प्रकार असले तरी उपास्याकडे उपासनेचा वाहणारा प्रवाह, सखोल होत जातो. प्रतीकोपासन म्हणजे अंग. एकदेशी जाणीव घेणे हेच प्रतीक होय. गाईच्या पुच्छस्पर्शात सर्व गाईस स्पर्शिल्याचे पुण्य लाभते. तेथे पुच्छ हे प्रतीक होय. चरण पादुका हे प्रतीकच होय. ब्रह्मवस्तूचेच, सर्व देवता हे अंग होत. म्हणून कोणत्याही अंगोपासनेत ब्रह्मोपासनाच आहे. प्रतीकांत ज्याचे प्रतिक, तो परिव्याप्त असतो. प्रतिरुपात, 'प्रतिकृति - प्रतिमा' व 'भाव प्रतिमा' अशा दोन रुपांनी प्रतिमा जाणतात. उदा. कृष्ण-राम इ. मूर्ती ही प्रतिकृति प्रतिमा होय व शालिग्रामाप्रमाणे विष्णूदर्शी भाव स्थापून आकृती उपासना ही भावप्रतिमा होय. भावरुप अवस्थामध्ये एकलव्याच्या उपासनेचे उदाहरण स्पष्ट आहे. 'गुरु' यांत खरे म्हणजे आकार नाही. द्रोणास आकार होता. पण धनुर्वेद शिकविणाऱ्या द्रोणांचा, गुरुरुप आकार संभवनीय नाही. तेथे एकलव्याने द्रोणांची मूर्ति करुन तिच्यात गुरुंचा भाव स्थिर केला व आकार नसलेल्या गुरुकडून केवळ भावरुप मूर्तिद्वारे धनुर्वेदात तो पारंगत झाला. प्रतीक द्रोणांचे पण भावरुप मात्र श्रीगुरुंचे ! एकलव्याने द्रोणांची नव्हे तर धनुर्वेद शिक्षकाची आराधना साधली. निदानोपासनात रंगाद्वारे उपास्य धर्माचा संकेत असतो. हे सर्व उपासना प्रकार, उपासनेच्या विकासांत प्रत्येक उपासकास घ्यावे लागतातच. एकाच उपासनेच्या प्रवाहाचा अखंड भाव उत्कर्षाच्या मापाने या उपासनांनी प्रकट होत असतो. ज्याचा जो मानस वा अधिकार, तेथून त्याने उपासना सुरु करावी. अर्चना, स्तुति, जप, ध्यान व सेवा ही उपासनेची मुख्य पाच अंगे होत. त्यातही जप, ध्यान व सेवा ही प्रमुख आहेत. भक्तीत जप, स्तुति व अर्चना येतातच. ध्यान हेच अध्ययन होय व दान समर्पण ही सेवा होय. उपासकाने प्रभुप्रेमप्राप्तीचा उपाय म्हणून ह्या गोष्टी अवलंबिल्या पाहिजेत - सुकृत, मनायुः, सुप्रावी व सोमी. सुकृत म्हणजे ज्यामुळे देवाचा सन्मार्ग बाधित होतो, त्या दुष्कृता विरुद्ध विहार सुकृत म्हणता येईल. म्हणजेच ईश्वराचे धर्म व गुण अंगी आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. मनायुः म्हणजे मनन करा. ईश्वराठायी मन लावा. वारंवार उपास्यांत मन स्थिर करा. यासाठी चिंतन, अनुसंधान व निदिध्यास ठेवणे म्हणजे मनायु होणे. सुप्रावी म्हणजे प्राणीमात्रांवर दयाभूत असणे, त्यांची सेवा व त्यांचे रक्षण करणे. यात अहिंसा, करुणा व धर्मभाव जोपासावे. सोमी म्हणजे नित्य शांत रहा. अप्रतिकारत्व घ्या. अक्रोध रहा. प्रत्येक साधकाने ईश्वर प्रेमलाभार्थ फार मोठी साधना नच जुळली तरी वरील चार गोष्टी पाळाव्यातच. साधनेसाठी कमीतकमी स्वरुपाची ही मागणी आहे.




Comments