हरि ही कृपाक्षरे
- shashwatsangati
- May 14
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
जसे स्मरण तसे स्फुरण. जसे स्फुरण तसे स्मरण. असे ते परस्परावलंबी शब्द आहेत आणि यासाठी स्मरण हा धर्म ज्या बुद्धीचा आहे. त्याच्याशी स्फुरण हा धर्म ज्या इंद्रियकेंद्राचा (मनाचा) आहे याचा संबंध जोडला पाहिजे. तरच या स्मरणाचा हवा असलेला परिणाम घडेल. कारण पापक्षालन करावयाचे आहे. म्हणून स्मरण जे पवित्र तशी कामेही पवित्रच केली पाहिजेत. नाहीतर 'मुखमे राम-बगलमे छुरी' असे व्हायचे ! यासाठी येथे मुख शब्दाचे वैशिष्ट्य आहे. वेदांत 'मुख' शब्द मोठ्या महत्त्वाने आला आहे. परमेश्वराच्या मुखातून ब्राह्मण ज्ञाती निर्माण झाली असे तेथे वर्णन आहे. म्हणून मुखाच्या ठायी जर हरि ठेवाल तर ते निश्चित पुण्यप्रद घडेल. याचा अर्थ असा की, प्रत्येक कर्म करताना प्रथम आपल्या अंतःकरणात हरीला आठवा. आता कर्माशिवाय तर क्षण नाही, म्हणून प्रत्येक क्षणी त्या हरीला आठवा. म्हणजे इंद्रिय- वृत्तीच्या स्फुरणेपूर्वी हरि स्मरणाची वृत्ती जागवा. यामुळे भावना शुद्ध होऊन, होणारे कर्म आपल्या देवाचे आहे, देवासाठी आहे असा बोध होतो व यातच देवपूजा सुरू होते. अर्थात् तुम्ही सर्व कर्म देवासाठीच करा किंवा प्रत्येक कर्मात देव ओता. म्हणजे मनाठायी देव घ्या व कर्म करा. हळूहळू ईश्वरच सर्व कर्म करतो असे कळेल व आपोआप कर्मलेपातून तुम्ही मुक्त व्हाल. यामुळे प्राप्त होणाऱ्या पुण्यास माप नाही. ते कोणी मापावे? कारण हरि हरि म्हणता म्हणता हरिरूपता येईल. हे सांगायचे कारण असे की जर कोणी ज्ञाते असे म्हणतील की काय हो, हरि हरि जर म्हणावे तर ते ही कर्म झाले ! तेथे कर्ता उभा झाला, मग तो याने मुक्त कसा होईल ? ज्ञानराज म्हणतात की अहो कर्माची गती जाणणाऱ्या धर्मज्ञांनो, हरि हरि म्हणणे हे कर्म खरे पण तेथे कर्ताच हरिरूप होणार आहे. हेच त्या कर्माचे फळ आहे. त्यासच कर्मविपाक म्हणतात. त्याच कर्माचे बंधन पडत असते की, ज्या कर्मात फळ व कर्ता वेगळे असून तो फळभोक्ता होतो. पण येथे तसे घडत नाही. कर्मफळ, कर्म व कर्ता हे सारे या कर्माने एकाकारच होतात. म्हणून हे कर्म पुण्यप्रद असले तरी बंधनकारक नाही. म्हणूनच आम्ही इतर पुण्यफळे व या कर्माने झालेले पुण्य यात भेद केला. प्रत्येक पुण्याचे माप आहे व त्याचप्रमाणे त्यांचे फळ आहे की जे कर्ता भोगत असतो. पण येथे जे पुण्य घडते ते अमाप असून ते मोजणाराच कोणी नाही. कारण की ते कोणासही मोजता येत नाही. तरी हरि हरि म्हणणे हे कर्म नव्हे. तर ती कृपाक्षरे आहेत असेच जाणा. ते प्रभूचेच उच्छ्वास आहेत. त्याला कर्ता नाही. ते स्मरण अपौरुषेयच होय.





Comments